उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:23 IST2025-12-15T18:18:41+5:302025-12-15T18:23:42+5:30
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Congress: मुंबई पालिकेच्या नव्या राजकीय समीकरणांवर मुख्यमंत्री काय म्हणाले, वाचा

उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Congress: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेसह सर्व महापालिकांच्या निवडणुकांसाठी (Municipal Elections 2026) १५ जानेवारीला मतदान होणार आहे आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर केले जाणार आहेत. यंदाच्या मुंबई पालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्रित लढणार आहेत. तसेच, महाविकास आघाडीचे त्यांना पाठबळ मिळू शकेल. याबाबतच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
"मुंबई पालिकेत दोनही ठाकरे एकत्र आल्याचा आम्हाला कुठलाही फटका बसणार नाही. दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरीही, नाही आले तरीही कुठलाही फटका बसणार नाही. तसेच दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर आमच्या भाजपा शिवसेना महायुतीलाच निवडून देतील. कारण आमचा कारभार, आम्ही केलेला विकास आणि मराठी माणसाचं जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत राहतील," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
"मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे आम्ही देखील दाखवले आहे, पण त्याकरता निवडणुका घ्यायच्या नाहीत असे करता येणार नाही. गेले २०-२५ वर्षे जे लोक निवडणुका लढवत आहेत, त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात मतदार यादीमध्ये घोळ असतोच. पण सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा अशी ओरड करणे योग्य नाही. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत. त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे. म्हणून आमची मागणे आहे की निवडणुका वेळेवरच व्हाव्यात," असे ते म्हणाले.