Uddhav Thackeray on Navneet Ravi Rana: हनुमान चालिसा वाचायचीय, माझ्या घरी या, पण दादागिरी नाही! उद्धव ठाकरेंची मोठी सभा घेण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 20:48 IST2022-04-25T20:29:14+5:302022-04-25T20:48:52+5:30
Uddhav Thackeray on Navneet Ravi Rana: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवनीत रवी राणा यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या आव्हानाचाही समाचार घेतला. तसेच भाजपावरही त्यांनी टीका केली.

Uddhav Thackeray on Navneet Ravi Rana: हनुमान चालिसा वाचायचीय, माझ्या घरी या, पण दादागिरी नाही! उद्धव ठाकरेंची मोठी सभा घेण्याची घोषणा
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामुळे गेले तीन दिवस राज्यातील वातावरण तापलेले आहे. राणा दाम्पत्याला अटक झाली आहे. यावरून लोकसभेने राज्य सरकारला २४ तासांत राणांसोबत खार पोलीस कोठडीत झालेल्या गैरव्यवहारावर उत्तर मागितले आहे. या साऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे.
जर कोणाला हनुमान चालिसा वाचायची असेल तर घरी येऊन वाचा, त्याचीही एक पद्धत असते. दादागीरी करून येऊ नका, बाळासाहेबांनी ही दादागिरी कशी मोडायची हे शिकविले आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेस्टच्या एनसीएमसी कार्डचा लोकार्पण सोहळा झाला, तेव्हा त्यांनी अराजकीय कार्यक्रमात बोलायचे नाहीय पण गेल्या काही दिवसांपासून जे सुरु आहे, त्यावर बोलावे लागेल असे ते म्हणाले.
शिवसेनेने हिंदुत्व सोडले, हे सांगितले जाते. ते काय धोतर आहे का?आमचे घंटाधारी नाही तर गदाधारी हिंदुत्व आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले? बाबरी पाडली तेव्हा कुठे बसलेले? राम मंदीर बांधण्याचे म्हणताय तर तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे, तुमचा नाही, तुम्ही तर ते बांधण्यासाठी हात पसरले, अशी टीका त्यांनी भाजपावर केली. याचबरोबर त्यांनी नवनीत रवी राणा यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या आव्हानाचाही समाचार घेतला.
बाळासाहेब म्हणालेले घंटा बडविणारा हिंदू नकोय, तर दहशतवाद्यांना बडविणारा हिंदू हवा आहे. तुम्हाला हनुमान चालिसा घरी वाचायची असेल, तशी संस्कृती तुमच्या घरात नसेल तर माझ्या घरी वाचू शकता, परंतू त्याची एक पद्धत असते. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, साहेबांच्या काळातही येत होते. पण दादागिरी कराल तर ती मोडून काढू, लवकरात लवकर मी एक जाहीर सभा घेणार आहे. मी किंवा अजित पवार मास्क काढत नाही, तोवर तुम्हीही मास्क काढू नका. सक्ती नसली तरी मुक्ती मिळालेली नाही. मला मास्क काढून बोलायचे आहे. एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.