"उद्धव ठाकरे हे एक बिनडोक राजकारणी, त्यांनी...!" भाजप नेते बावनकुळे यांचा हल्लाबोल; बरंच काही बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:34 IST2025-01-24T13:33:29+5:302025-01-24T13:34:09+5:30
उद्धव ठाकरेंनी अजूनही 'त्या' मानसिकतेतून बाहेर पडावे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी चार गोष्टी चांगल्या कराव्यात जेणेकरून त्यांच्या पक्षालाही पाठबळ मिळेल," असा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी ठाकरेंना दिला...

"उद्धव ठाकरे हे एक बिनडोक राजकारणी, त्यांनी...!" भाजप नेते बावनकुळे यांचा हल्लाबोल; बरंच काही बोलले...
उद्धव ठाकरे हे एक बिनडोक राजकारणी आहेत. जनतेतील प्रतिमा मलीन झाल्यानंतरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यानंतरही ते दुरुस्त होत नाहीयेत. खरे तर, एका नेत्याकडून १३ खासदार आणि ५० आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचे नेतृत्व कोणीही मान्य करण्यास तयार नाही. म्हणूनच खासदार आणि आमदार निघून गेले. खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता. म्हणून लोक एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यांचेच लोक त्यांच्यापासून निघून गेल्यानंतर, ते भाजपला दोष देतात. अमित शाह, मोदीजी आणि भारतीय जनता पक्षावर ते नेहमीच टीका करतात. त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे की, आपण कुठे चुकलो आहोत? अशा शब्दात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. ते पत्रकारांशी बोलत होते.
बावनकुळे पुढे म्हणाले, "जर त्यांनी आमदार आणि खासदारांना योग्य वागणूक दिली असती, तर महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली नसती. राहिला प्रश्न २०१९ चा, तर गद्दारी केलीचना. गद्दारी झालीच त्यांच्याकडून. ते सरळ भारतीय जनता पक्षासोबत निवडून आले होते. महाराष्ट्राला गद्दारीचे जे गालबोट लागले ते उद्धव ठाकरेंनी लावले आहे. त्यांनीच गद्दारीची सुरुवात केली. जर त्यांनी तेव्हा भाजपासोबत गद्दारी केली नसती, तर महाराष्ट्राचे वेगळे चित्र असते. त्यामुळे आता आपला दोष लोकांवर देणे, अशी भाषणे करत राहणे, माध्यमांचा आणि महाराष्ट्राचा वेळ वाया घालवणे, त्यापेक्षा एका चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता येईल."
आज जी परिस्थिती आहे, त्याहूनही आणखी वाईट परिस्थिती होईल -
"उद्धव ठाकरे निराश आहेत आणि असे बोलणे हे वेडेपणाचे लक्षण आणि बिनडोकपणा आहे. अजूनही सुधारत नाहीयेत. मला वाटते की, अमित शाह यांच्यावर, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अथवा आमच्या पक्षावर टीका करून काहीही साध्य होणार नाही. आज जी परिस्थिती आहे, त्याहूनही आणखी वाईट परिस्थिती होईल आणि आमचे जनमत आणखी वाढेल. उद्धव ठाकरेंचे जनमत रोज कमी होईल," असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी अजूनही 'त्या' मानसिकतेतून बाहेर पडावे -
याशिवाय, "उद्धव ठाकरेंचे या पद्धतीने वागणे आणि कोणत्या घटनेला, ज्या घटनेला तेच जबाबदार आहेत, त्या घटनेला धरून बोलणे, महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे. महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे. आता महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यारे राज्य आहे. पंतप्रधान मोदीजी आणि देवेंद्रजींचे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणार आहे. उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेतून बाहेर पडावे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी चार गोष्टी चांगल्या कराव्यात जेणेकरून त्यांच्या पक्षालाही पाठबळ मिळेल," असा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी ठाकरेंना दिला.