uddhav thackeray government orders inquiry of tree plantation program done by the devendra fadnavis government | फडणवीसांच्या काळातील वृक्षलागवड कितपत यशस्वी?; ठाकरे सरकार करणार चौकशी

फडणवीसांच्या काळातील वृक्षलागवड कितपत यशस्वी?; ठाकरे सरकार करणार चौकशी

ठळक मुद्दे५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा फडणवीस सरकारचा दावावृक्ष लागवड अभियानातून अपेक्षित काम न झाल्याची ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांना शंकावनमंत्री संजय राठोड यांच्याकडून वृक्ष लागवड अभियानाच्या चौकशीचे आदेश

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी वृक्ष लागवड अभियानात सहभाग घेतला होता. त्यावेळी एक रोपटं लावताना याचा पुढे वटवृक्ष होईल आणि आमची मैत्री या झाडाप्रमाणेच वाढत जाईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यत्त केली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे. 

देवेंद्र फडणवीस सरकारनं ५० कोटी वृक्ष लावण्याचा दावा केला होता. यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर दरवर्षी साधारणत: १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या अभियानातून अपेक्षित काम न झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारमधल्या काही मंत्र्यांनी उपस्थित केली होती. त्यांनी या संदर्भात लेखी पत्रदेखील दिलं. त्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिल्यानं विभागाचे प्रधान सचिव येत्या आठवड्यात नागपुरला जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत किती वृक्ष लावण्यात आले, त्यातले किती वृक्ष जगले, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती देशी होते, किती परदेशी होते, याची चौकशी प्रधान सचिवांकडून करण्यात येईल. 

ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. सरकारनं वृक्ष लागवडीची चौकशी करावी. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीचा आढावा घ्यावा, असं त्यांनी म्हटलं. वृक्ष लागवड हे ईश्वरीय कार्य असून ते पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आम्ही या अभियानात अत्यंत गांभीर्यपूर्वक काम केल्याचं त्यांनी सांगितलं. वृक्ष लागवड अभियानात वन मंत्रालयासह एकूण ३२ विभाग कार्यरत होते. या अभियानातले ६० टक्के वृक्ष इतर विभागांनी लावले आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी नागपुरात एक उत्तम कमांड रूम उभारण्यात आली होती. सरकारच्या त्या अभियानाची लिम्का बुकनंदेखील नोंद घेतली होती, असं मुनगंटीवार म्हणाले. 

Web Title: uddhav thackeray government orders inquiry of tree plantation program done by the devendra fadnavis government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.