Uddhav Thackeray: तुटून पडा! भाजप, राज ठाकरेंना सडेतोड उत्तर द्या; उद्धव ठाकरेंचे आदेश निघाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 20:48 IST2022-04-29T20:48:25+5:302022-04-29T20:48:44+5:30
Uddhav Thackeray: शिवसेनेला हिंदुत्वावरून डिवचणाऱ्या भाजपा आणि मनसेचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपा, मनसेवर तुटून पडा, असे आदेशच ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना दिले आहेत.

Uddhav Thackeray: तुटून पडा! भाजप, राज ठाकरेंना सडेतोड उत्तर द्या; उद्धव ठाकरेंचे आदेश निघाले
गेल्या काही दिवसांपासून चोहुबाजुंनी घेरली गेलेली शिवसेना नवनीत रवी राणांच्या आंदोलन प्रकरणामुळे चांगलीच सक्रीय झाली आहे. राणा, किरीट सोमय्या हल्ला प्रकरण संपत नाही तोच आता राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा घेत शिवसेनेला घेरण्याचा आणि ३ मे रोजी मशीदींवरील भोंग्यांवरून आव्हान दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
शिवसेनेला हिंदुत्वावरून डिवचणाऱ्या भाजपा आणि मनसेचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपा, मनसेवर तुटून पडा, असे आदेशच ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना दिले आहेत. बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते, असा सवालही राज यांच्या बदललेल्या भूमिकेवर उपस्थित केला आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कधी नव्हे तो थेट राज ठाकरेंवर टीका केली आहे. ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जशास तसे उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचे काय सुरु होते? आपली कामं लोकापर्यंत पोहोचवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या जिल्हा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेना भवनातून ॲानलाईन मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे इतर नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. 1 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत.