Uddhav Thackeray: 'राज्यात सध्या बाप पळवणारी टोळी फिरतीये', उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 20:29 IST2022-09-21T20:21:58+5:302022-09-21T20:29:04+5:30
'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरत आहे, आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.'

Uddhav Thackeray: 'राज्यात सध्या बाप पळवणारी टोळी फिरतीये', उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
मुंबई: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे. यातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभेतून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या राज्यात बाप पळवणारी टोळी फिरतीय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, संजय राऊत एकटे लढत आहेत, मोडेन पण वाकणार नाही, असा आमचा संजय आहे, अशा शब्दात त्यांनी राऊतांचे कौतुक केले.
संबंधित बातमी- “अमित शाह म्हणतात शिवसेनेला जमीन दाखूव, आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू”; उद्धव ठाकरेंचा घणाघात
'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची...'
मुंबईच्या पालिका निवडणुकीवरुनही उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. 'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरू लागली आहे. हे काही नवीन नाहीये, आम्ही शिवरायांचा इतिहास वाचलाय. त्यावेळेसही आदिल शहा, निझाम शहा, हा शहा, तो शहा चालून आले. आताही अमित शहा येऊन गेले. देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही, इथल्या जमिनीत गवताची पाती नाहीत, तलवारीची पाती आहेत. तुम्हाला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही,' अशा शब्दात त्यांनी शहांवर टीका केली.
संबंधित बातमी- 'मुंबई आणि कमळाबाईचा काय संबंध? ही आमची मातृभूमी', उद्धव ठाकरे कडाडले
'युतीत 25 वर्षे सडली'
'दुर्दैवाने आपण त्यांच्यासोबत युती केली. मी पुन्हा बोलतोय, 25 वर्षे युतीमध्ये सडली. ही सगळी नालायक माणसे जोपासली. मेहनत आम्ही घ्यायची आणि फुकत त्यांना द्यायच. आमच्या जिवावर वरती पोचलात आणि आम्हाला लाथा मारताय. ही लोक आमच्या वंशावर आमच्या घराण्यावर टीका करत आहेत. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. वंशावर टीका करणार असाल, तर तुमचा वंश कोणता, त्यावर आधी बोला,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.