डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर...; उद्धव ठाकरेंची भाजपा, RSS वर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 08:13 AM2023-05-11T08:13:53+5:302023-05-11T08:14:51+5:30

राजकीय विरोधकांची बदनामी, त्यांच्या सूडबुद्धीने सुरू असलेल्या अटका हा चिंतेचा विषय आहे. हे घडवून आणण्यासाठी मोक्याच्या जागी स्वतःची माणसे चिकटवणे हे एकंदरीत धोरण आहे असं ठाकरेंनी अग्रलेखातून म्हटलं आहे.

Uddhav Thackeray criticized the BJP-RSS over the DRDO Scientist Dr. Kurulkar case | डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर...; उद्धव ठाकरेंची भाजपा, RSS वर टीका

डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर...; उद्धव ठाकरेंची भाजपा, RSS वर टीका

googlenewsNext

मुंबई - देशाची धोरणे ठरवणे हे आता रा. स्व. संघाच्या हातात आहे. राजकीय विरोधकांची बदनामी, त्यांच्या सूडबुद्धीने सुरू असलेल्या अटका हा चिंतेचा विषय आहे. हे घडवून आणण्यासाठी मोक्याच्या जागी स्वतःची माणसे चिकटवणे हे एकंदरीत धोरण आहे. डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर थेट दाऊदशी संबंध जोडून विरोधी पक्षालाच जाब विचारणारे आंदोलन सुरू झाले असते, पण 'दे. भ.' डॉ. कुरुलकरांच्या बाबतीत भाजप व संघ 'मौना'त गेले. यालाच ढोंग म्हणतात अशा शब्दात सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी भाजपा, आरएसएस यांच्यावर टीका केली आहे. 

तसेच नवाब मलिक यांनी एक जमिनीचा तुकडा विकत घेतला. इकडे भाजपच्या देशभक्तांनी देश विकला! फरक कळतोय का? निदान महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यांनी तरी यावर प्रश्न विचारायला हवेत. मोदींचे सरकार आल्यापासून देशातील अत्यंत संवेदनशील जागेवर संघ परिवाराने स्वतःची माणसे हट्टाने बसवली. त्यांना देशाचा नकाशा बदलता आला नाही. त्यामुळे ते संस्कृती बदलू पाहत आहेत व त्यासाठी मोक्याच्या जागी माणसे चिकटवली जात आहेत. त्यातील एक डॉ. प्रदीप कुरुलकर. या महाशयांना आता 'एटीएस' म्हणजे दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
डॉ. कुरुलकर हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ. त्यांच्या अटकेने जशी खळबळ माजायला हवी होती तशी माजली नाही. कर्नाटकच्या निवडणुकीत संघ परिवाराने बजरंग बली वगैरे उतरवले, पण देशाच्या विज्ञान संरक्षण विभागातील 'गुपिते' पाकसारख्या दुष्मनांना विकणाऱ्या कुरुलकरांच्या विषयावर एकही भाजपवाला, संघवाला तोंड उघडायला तयार नाही. 

डॉ. कुरुलकर हे शास्त्रज्ञ 'हनी ट्रप'मध्ये अडकले व गुपिते बाहेर देऊ लागले. अनेक गोपनीय माहिती त्यांनी दुष्मन राष्ट्रांना पुरवली. यात पाकिस्तानचा समावेश आहे. पाकिस्तानी महिलेच्या मोहात ते पडले व त्यांनी हे कारनामे केले, ही बाब गंभीर आहे. पण 'डीआरडीओ' सारख्या संवेदनशील संस्थेतला हा राष्ट्रद्रोह भाजप पचवू पाहत आहे. 

कारण अटक झालेल्या शास्त्रज्ञाचे नाव अब्दुल, हुसेन, सर्फराज, शेख असे नाही. ते तसे असते तर 'डीआरडीओ'मध्ये पाकडे घुसवून देशाला धोका निर्माण करण्याचे काम विरोधी पक्ष कसे करीत आहे यावर चर्चासत्रे झडली असती. भाजपचे पुढारी रस्त्यावरही उतरले असते. देश पाकडय़ांच्या हाती विकला असे त्यांनी जाहीर केले असते, पण कुरुलकरांच्या बाबतीत मामला ‘थंडा' पडला आहे. 

'डीआरडीओ'मध्ये डॉ. कुरुलकर हे वरिष्ठ शास्त्रज्ञ होते. त्यांचा जुना आहे. संघाच्या अनेक सोहळय़ांत ते संघ गणवेषात उपस्थित राहिले आहेत. संघाच्या व्यासपीठावर त्यांचा वावर राहिला आहे. आपण 'संघी' असल्याचे ते गर्वाने सांगत. राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती वगैरे बाबींवर ते प्रवचने झोडत, पण त्याच वेळी परकीय शक्तींना ‘लेदर करन्सी'च्या बदल्यात ते देशाची गुपिते विकत होते. 

डॉ. कुरुलकर यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट होता व या पासपोर्टवर ते अनेक देशांत फिरून येत. आज त्या देशात जाऊन त्यांनी काय दिवे लावले याचा तपास सुरू आहे. कुरुलकरांच्या 'डीआरडीओ' गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिला बाहेरून येत-जात असत. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेशी निगडित काही फोटो व माहिती परकीयांच्या हाती दिली. 

कुरुलकरांच्या 'मेल आयडी'वरून पाकिस्तानशी वारंवार संपर्क साधला गेला अशी माहिती समोर आली. याआधी भारतीय परराष्ट्र सेवेतील माधुरी गुप्ता हिलासुद्धा अशाच प्रकरणात अटक झाली होती हे महत्त्वाचे. हेरगिरीची अशी प्रकरणे नवीन नाहीत, पण संरक्षण खात्यातील, विदेश मंत्रालयातील वरिष्ठ लोकच अशा कबुतरबाजीत सहभागी होतात तेव्हा धक्का बसतो. 

डॉ. कुरुलकर यांचे प्रकरण गंभीर आहे, कारण या माणसावर संघ विचाराचे (म्हणजेच देशभक्तीचे) पुरेपूर संस्कार झाले आहेत. कुरुलकर यांनी शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे काम चोख केले. नवे संशोधन केले हे खरे. संरक्षणविषयक धोरणे ठरवणाऱ्या 10 शास्त्रज्ञांची जी समिती राष्ट्रीय पातळीवर नेमण्यात आली त्यात डॉ. कुरुलकरांचा समावेश आहे. 

जगातील कोणत्या राष्ट्राशी आपले संरक्षणविषयक काय संबंध असावेत, त्या राष्ट्राशी हिंदुस्थानचा व्यवहार कसा असावा, या राष्ट्रांशी संरक्षणविषयक माहिती आणि संशोधनाची देवाण - घेवाण करावी की नाही हे ठरविण्याचे अधिकार या उच्चस्तरीय समितीस होते व त्यात डॉ. कुरुलकरांचा समावेश होता. 

डॉ. कुरुलकर यांना संघाची, पर्यायाने भाजपची कवचकुंडले होती हे उघडच झाले. संघ विचारांचा इतका मोठा शास्त्रज्ञ फितूर झाला तरीही ना पंतप्रधान बोलत आहेत, ना संरक्षणमंत्री बोलायला तयार आहेत. निदान नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याची थुंकी उडवून आरोपबाजी करणाऱ्यांनी तरी डॉ. कुरुलकरांच्या कारनाम्यांवर बोलायला नको काय? 

संघ परिवाराने गेल्या सात-आठ वर्षांत संरक्षण, विज्ञान, कला, संस्कृती, कायदा, न्याय आणि प्रशासनात त्यांची माणसे बसवली. केंद्रीय तपास यंत्रणांचेही तेच हाल आहेत. त्यामुळे असे प्रखर राष्ट्रवादी, देशभक्त डॉ. कुरुलकर कोणते मुखवटे लावून कोठे वावरत आहेत, ते सांगता येणार नाही. 

देशाच्या न्यायव्यवस्थेचा खेळखंडोबा याचमुळे झाला. देशाची धोरणे ठरवणे हे आता रा. स्व. संघाच्या हातात आहे. राजकीय विरोधकांची बदनामी, त्यांच्या सूडबुद्धीने सुरू असलेल्या अटका हा चिंतेचा विषय आहे. हे घडवून आणण्यासाठी मोक्याच्या जागी स्वतःची माणसे चिकटवणे हे एकंदरीत धोरण आहे. 
 

Web Title: Uddhav Thackeray criticized the BJP-RSS over the DRDO Scientist Dr. Kurulkar case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.