“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:33 IST2025-11-05T13:31:59+5:302025-11-05T13:33:41+5:30

Uddhav Thackeray News: शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे आणि जूनमध्ये नाही तर तात्काळ कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

uddhav thackeray criticized state govt over farmers issues and loan waiver | “मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला

“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांचा 'दगाबाज रे' शेतकरी संवाद दौरा सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. शेतकरी हा भोळाभाबडा आहे, पण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका. मराठवाड्यात मोठी आपत्ती आली असताना राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. दिवाळीपूर्वी मदत देऊ म्हणाले, पण मदतीच्या नावावर आळस करत आहेत, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

आता जे मुख्यमंत्री आहेत ते पंचांग काढून बसले आहेत. राहु कुठे आहे केतु कुठे आहे? ते बघत आहेत. त्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी आहे. बिहारमध्ये बसता बसता पडले, पडता पडता बसले तो भाग वेगळा. आता त्यांनी मुहूर्त काढला आहे पुढच्या वर्षीच्या जूनचा. जूनमध्ये कर्जमुक्ती करणार असतील तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे की नाही? कर्जमुक्ती होणार असेल तर हप्ते का भरायचे? सगळ्या कर्जाची माफी जूनमध्ये होणार आहे का? आपले सरकार आले. छत्रपती महाराज शेतकरी कर्जमाफी योजना आणली. मला कुणी ढ म्हणू द्या, अडाणी म्हणू द्या, पण मी अभ्यास न करता दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

तात्काळ कर्जमुक्ती झाली पाहिजे 

मराठवाड्यात इतिहासात कधी नव्हे इतकी भीषण नैसर्गिक आपत्ती आलेली असताना, राज्य सरकार केवळ 'अभ्यास' करण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे आणि जूनमध्ये नाही तर तात्काळ कर्जमुक्ती झाली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. पीक विमा कंपन्या दोन-तीन रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत. एका शेतकऱ्याला तर केवळ ८९ रुपये मिळाले. तर दुसरीकडे विदेशी समिती स्वदेशी शेतकऱ्यांची वाट लावणार आहे, असा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शेतकरी हताश झाला आहे, त्याला आता मदत केली नाही तर तो संकटात जाईल. हे खोटे बोलणारे सरकार आहे. न्याय मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे.  शेतकरी म्हणून एकत्र आलो तरच न्याय मिळणार आहे. शेतकरी जमिनीतून कोंब फोडू शकतो, तर राज्य सरकारला नक्कीच फोडणार. जूनमध्ये कर्जमाफी जाहीर केली आहे म्हणजे कोपराला गूळ लावणे आहे. कोपराला गूळ लावला की तो चाटताही येत नाही आणि गूळ आहे म्हणून काढता येत नाही. जर सरकार दगाबाज असेल तर त्यांच्याशी दगा केला पाहिजे. त्यांना सांगा आधी कर्जमुक्ती द्या मग आम्ही तुम्हाला मते देऊ. माझा शेतकरी अन्नदाता आहे, कर्जमुक्ती केली तरच मते देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

Web Title : किसानों की सहायता में देरी पर ठाकरे ने सरकार की आलोचना की, मंशा पर सवाल

Web Summary : उद्धव ठाकरे ने प्राकृतिक आपदाओं से प्रभावित किसानों को सहायता में देरी करने के लिए राज्य सरकार की आलोचना की। उन्होंने उनकी मंशा पर सवाल उठाया और जून के वादों के बजाय तत्काल ऋण राहत की मांग की।

Web Title : Thackeray Slams Government's Delay in Farmer Aid, Questions Motives

Web Summary : Uddhav Thackeray criticizes the state government for delaying aid to farmers affected by natural disasters. He questions their motives and demands immediate debt relief, not promises for June.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.