“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:55 IST2025-11-06T12:51:25+5:302025-11-06T12:55:45+5:30
Uddhav Thackeray News: सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजपैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्षात किती आले? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.

“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
Uddhav Thackeray News: मी तुम्हाला हिंमत द्यायला आलो आहे. तुमच्या आशीर्वादाने कर्जमाफी केली होती. सगळीकडचे शेतकरी म्हणतात की, ती मदत मिळाली नाही, मग पैसा गेला कुठे? ऊन पाऊस वाऱ्यात थंडीत शेतकरी मर-मर मरतो, शेतकरी भीक मागत नाही. प्रतिकूल परिस्थितीत सोने पिकवायचे आणि एका रात्रीत सर्व माती मोल होते. आधी म्हणाले सातबारा करणार कोरा, मग आता कुठे गेला रे चोरा… मतचोरा, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे हे ४ दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सरकारवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांची एक क्लिप ऐकवली. ३१ तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा. ही खोटी निर्दयी माणसे यांना पाझर फुटणार नाही. आता जूनचा मुहूर्त काढला आहे. जोपर्यंत कर्जमाफ होत नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही. हेक्टरी ५० हजार पीकविमा मिळत नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही असा निर्धार करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या
लाडकी बहीण योजना बंद करू नका. निवडणुकीच्या आधी त्यांनी सांगितले होते की, आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला १५०० नाही तर ₹२१०० देऊ. तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या. आता का नाही विचारले लाडक्या बहिणींना की, तुम्हाला मिळतात की नाही पैसे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
दरम्यान, आताच्या सरकारने इतिहासातील सर्वांत मोठे पॅकेज जाहीर केल्याचा दावा केला आहे. पॅकेज म्हणे ३१ हजार आठशे कोटी म्हणजे आतापर्यंत इतिहासातील सगळ्यात मोठे पॅकेज जाहीर केले. जाहीर करायला कोणाच काय जाते. जाहीर केलेल्या पॅकेजपैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्षात किती आले? ज्या दिवशी ते सगळे पैसे येतील, त्यावेळी मुख्यमंत्र्यापेक्षा आनंदी मी असेन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.