विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:52 IST2025-07-20T09:51:54+5:302025-07-20T09:52:06+5:30
विधानसभेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपात आणि उमेदवारांची निवड करण्यातही विलंब झाला, असे मत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
मुंबई : विधानसभेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपात आणि उमेदवारांची निवड करण्यातही विलंब झाला, असे मत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. अशाच चुकांची पुनरावृत्ती झाली तर मग महाविकास आघाडीचे औचित्य काय उरेल, असा प्रश्नही त्यांनी केला.
उद्धवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मविआने जोरदार यश मिळविले होते, त्यावेळी असलेला उत्साह हा मोठ्या यशामुळे व्यक्तिगत अहंकारात बदलला, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाला.
तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये घोषणा करण्याची स्पर्धा
आमच्या पक्षाने ज्या जागा अनेकदा जिंकलेल्या होत्या त्यापैकी काही जागा या आम्हाला लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना द्याव्या लागल्या. विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला, ज्यामुळे जनतेत मविआबद्दल चुकीचा संदेश गेला. अशा चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये, तरीही तसे घडले तर सोबत राहण्याचा काहीच अर्थ उरणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मविआतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जनतेसाठी घोषणा करण्याची स्पर्धा लागली होती, त्यामुळेही नुकसान झाले.
ईव्हीएम घोटाळा, बनावट मतदार याद्या, मतदारांची अचानक वाढलेली संख्या हे विषय चर्चेत आहेतच. लाडकी बहीण सारखी भ्रामक योजना आणली गेली, त्याचाही आम्हाला फटका बसला पण चुका कबूल न करण्यातही अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.