"वन नेशन, वन इलेक्शन" यांना सगळं "वन, वन, वन", एकाधिकारशाही हवी आहे. सर्व एक. आपल्यालासुद्धा बरं वाटलेलं आधी, "एक विधान, एक निशान, एक प्रधान". हो बाबा, पाहिजे बरोबर, पण "विधान" म्हणजे यांचे जे बुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार, आम्हाला मान्य नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधानच आम्ही मानणार. "एक निशान" म्हणजे तुमचे फडके नव्हे तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा, हे आमचे निशान आहे आणि "एक प्रधान" म्हणजे ईव्हीएम आणि बोगस मतदानाने निवडून आलेला नाही, तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आमचा पंतप्रधान, हे आम्हाला मान्य आहे. असे म्हणत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला, ते ईशान्य मुंबईच्या वतीने आयोजित शिवसेनेच्या निर्धार शिबिरात बोलत होते.
ठाकरे म्हणाले, "जसे कमल हसन म्हणाले, यांना "इंडिया" नाही, "हिंडिया" करायचे आहे आणि पुन्हा तिथे मारामाऱ्या लावायच्या. हे जेव्हा मी वाचले, माझ्याकडे रोज कुणी ना कुणी येत असते. बिहारचे काही लोक आले होती, त्यांना मी विचारलं, ते म्हणाले, साहेब हे खरे आहे. जसे आपल्याकडे काही भाषा आहेत- कोकणी आहे, अहिराणी भाषा आहे, आणखी कुठली भाषा, प्रत्येक विभागाची एक एक वेगळी भाषा आहे. तशा बिहारच्या काही भाषा या आता लुप्त झाल्या आहेत आणि तिकडे हिंदी जोरात आली आहे."
हिंदीविरुद्धसुद्धा आमचा काही लढा नाही, पण... -"हिंदीविरुद्धसुद्धा आमचा काही लढा नाही. पण आता भाजप जे करते आहे, देशामध्ये फूट पाडण्याचे काम करते आहे, तोडा-फोडा आणि राज्य करा. हे यांचे जे काही चालले आहे, हे गाडण्यासाठी आपल्या हातामध्ये भगवा घेऊन पुढे जायचे आहे. म्हणून भगवा घ्यायचा आहे," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.