उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा दाबला...दोन्ही राजे आमनेसामने...पाहा काय घडले पुढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 18:44 IST2019-01-02T18:44:09+5:302019-01-02T18:44:58+5:30
कुडाळ येथील एका कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पुन्हा एकदा आमने-सामने आले.

उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा दाबला...दोन्ही राजे आमनेसामने...पाहा काय घडले पुढे
सायगाव : कुडाळ येथील एका कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पुन्हा एकदा आमने-सामने आले. यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्र्रसिंहराजेंचा खांदा दाबला. यावर शिवेंद्र्रसिंहराजेंनी ‘माझा खांदा सारखा का दाबता ? मी अजूनही फिट आहे. हवं तर प्रात्यक्षिक करून दाखवतो,’ असं म्हणत उदयनराजेंना कोपरखळी मारली. दोन्ही राजेंमध्ये झालेल्या या डायलॉगबाजीची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली.
जावळी तालुक्यातील कुडाळ येथील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार बुधवार, दि. २ रोजी पार पडला. या कार्यक्रमाला आ. शिवेंद्र्रसिंहराजे भोसले यांनी हजेरी लावली. मंदिरातून दर्शन घेऊन ते बाहेत पडत असतानाच समोरून खा. उदयनराजे भोसले आपल्या कार्यकर्त्यांसमवेत कार्यक्रमस्थळी आले. दोन्ही राजे आमने-सामने येताच थांबले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच डायलॉगबाजी सुरू झाली. मात्र, ही डायलॉगबाजी विनोदातून सुरू होती.
उदयनराजे अन् शिवेंद्र्रसिंहराजे यांच्यात प्रथम गाडीवरून चर्चा झाली. ‘तुमची गाडी चांगली आहे,’ असे उदयनराजे म्हणाले. यावर ‘खासदार अन् आमदारांच्या गाडीत फरक असतो,’ असे उत्तर शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले. यानंतर खासदारांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या खांद्यावर हात ठेवून तो दाबला. त्यावेळी शिवेंद्र्रसिंहराजे यांनी लगेचच त्यांना मिश्कीलपणे उत्तर दिले. ‘मी अजून फिट आहे. सारखा काय माझा खांदा दाबताय. हवं तर प्रात्यक्षिक करून दाखवू का.’ यावर उदयनराजे यांनी डोळा मारत ‘मी फक्त खांदा मजबूत आहे का, ते पाहत होतो,’ अशी कोपरखळी मारली. या दोन्ही राजेंमधील जुगलबंदीची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली.