Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. संपूर्ण राज्यातून ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. या घडामोडी सुरू असतानाच ठाकरे गटाने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसच्या एका जिल्हाध्यक्षाने पक्षाला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला. यातच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. रिल टाकण्याचे माझ्या मनात होते. शिवजयंतीचे वातावरण होते आणि त्या वातावरणात फोटो चांगला होता. गळ्यात भगवा रुमाल होता. त्या फोटोवरून माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली आणि वातावरण असे झाले की, मी शिवसेनेत चाललो आहे. भगव्या उपरण्यातच जन्म झाला आहे. मी हिंदू धर्मात जन्मलो आहे. मी मानवता कार्यकर्ता आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. उदय सामंत यांनी यावर भाष्य करताना पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांना शिवसेना शिंदे गटात येण्याबाबत सुचवले आहे.
रवींद्र धंगेकरांना ताकदीने काम करायचे असेल तर एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही
पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांनी भगवा मफलर आणि भगवी टोपी घालून स्टेटस ठेवले. त्यावर मी सांगितले आहे की, त्यावर जर धनुष्यबाण आला, तर आम्हाला आवडेल. त्यांना आधीच निमंत्रण दिले आहे. त्यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकदीने काम करायचे असेल, सामाजिक क्षेत्रात काम करायचे असेल, तर एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत उदय सामंत यांनी पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांना खुली ऑफर दिली.
दरम्यान, यापूर्वी उदय सामंत यांनी दिलेल्या ऑफरवर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, त्यांना वाटते असेल की, आपला मित्र जवळ असला पाहिजे. कोणालाही तसे वाटते. माझा स्वभाव चांगला आहे. त्यामुळे ऑफर देणे काही चुकीचे नाही. मी कार्यकर्त्यांशी बोलेन. माझ्या डोक्यात अजून काही नाही. पण, जाताना काही लपून जाणार नाही. मला सगळ्यांशी बोलावे लागेल, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.