अंबरनाथ : बदलापूर येथे कात्रप परिसरात राहणाऱ्या अडीच वर्षांच्या एका मुलीचे रिक्षातून आलेल्या महिलेने अपहरण केले होते. ही मुलगी आपल्या आजीसोबत घरी जात असताना हा प्रकार घडला होता. सकाळी ८.३० वाजता हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी या मुलीच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली. मात्र, आज सायंकाळी कात्रप परिसरातील नाल्यात या मुलीचा मृतदेह सापडला. हा प्रकार अपहरणाचा आहे की, या मुलीच्या मृत्यूमागे दुसरे कारण आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. मंगला बोरसे ही महिला आपली नात केतकी हिरे हिला घेऊन आपल्या मुलीच्या घरी सोडण्यासाठी निघाली होती. या वेळी बोरसे यांनी गणेशघाट परिसरात जाण्यासाठी रिक्षा केली. रिक्षात बसून दोघी अंबरधारा या इमारतीजवळ आल्यावर बोरसे रिक्षातून उतरल्या. रिक्षात आधीपासूनच बसलेल्या महिलेने बोरसे यांच्या कडेवरील मुलीला खेचले आणि त्याच रिक्षातून पळ काढला. या प्रकाराची तक्रार येताच पोलिसांनी लागलीच या मुलीच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली. मात्र, तपासादरम्यान या मुलीचा मृतदेह कात्रप परिसरात एका नाल्यात सापडला. केतकीचे अपहरण करून हत्या झाली आहे की, त्यामागे दुसरे कारण आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.
बदलापुरात अडीच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून हत्या
By admin | Updated: August 16, 2014 02:58 IST