एसीबीने घेतल्या दोन विकेट
By Admin | Updated: October 8, 2014 00:50 IST2014-10-08T00:50:59+5:302014-10-08T00:50:59+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने आज अवघ्या पावणेदोन तासाच्या अंतरात दोन लाचखोरांच्या विकेट घेतल्या. पहिल्यांदा विक्रीपत्र करून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या

एसीबीने घेतल्या दोन विकेट
निबंधक कार्यालयातील रायटर जेरबंद : पोलीस शिपायालाही फटाके
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने आज अवघ्या पावणेदोन तासाच्या अंतरात दोन लाचखोरांच्या विकेट घेतल्या. पहिल्यांदा विक्रीपत्र करून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या निबंधक कार्यालयातील ‘रायटर‘च्या मुसक्या बांधल्या. तर, काही वेळेनंतर फटाक्याच्या दुकानाला तात्पुरती परवानगी देण्यासाठी २ हजारांची लाच मागणाऱ्या सक्करदरा ठाण्यातील पोलीस शिपायालाही एसीबीने फटाके लावले.
मौजा भांडेवाडी (पारडी) येथील तीन वेगवेगळ्या भूखंडांची विक्री करून घेण्यासाठी तक्रारकर्ता महालमधील सह दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते. येथे लिखाणकाम करणारा (रायटर) शेख अयूब ईस्माईल याने रजिस्ट्रीसाठी तयार करण्यात येणारी कागदपत्रे, लिखाणाची मजुरी आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी एकूण १ लाख, ९७ हजार, ५०० रुपयांची मागणी केली. तक्रारकर्त्या व्यक्तीने तडजोड केल्यानंतर १ लाख ८० हजार रुपये देण्याचे ठरवले. त्यापैकी १ लाख, ६० हजार तातडीने शेख अयुबच्या हातात घातले. उर्वरित २० हजार रुपये (साहेबांना देण्यासाठी) आज देण्याचे ठरले होते. मात्र, ही रक्कम द्यायची नसल्यामुळे तक्रारकर्ते थेट एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांच्याकडे पोहचले.
जाधव यांनी तक्रारीची शहानिशा करून घेतली. त्यानंतर आज सायंकाळी कारवाईसाठी सापळा लावला. ठरल्याप्रमाणे एसीबीच्या चमूने तक्रारकर्त्यांसह सह दुय्यम निबंधक क्ऱ ३ चे महालमधील कार्यालय गाठले.
पैसे घेऊन आलो, असे तक्रारकर्त्याने अयुबला सांगितले. अयुबने, ‘लाचेची रक्कम साहेबांसाठी आहे, ती ज्ञानदेव केशवराव भगत यांच्याकडे द्या’, असे सांगितले.
भगतने सायंकाळी ६ च्या सुमारास लाचेची रक्कम स्विकारताच एसीबीच्या पथकाने अयुब आणि भगतच्या मुसक्या बांधल्या.(प्रतिनिधी)
हे साहेब कोण आहेत?
निबंधक कार्यालयातील साहेबांना रक्कम द्यावी लागते, असे सांगून दलाल विक्री करणाऱ्याकडून आणि करून घेणाऱ्यांकडून रोज हजारो रुपये सर्रास उकळतात. हे साहेब कोण आहेत, त्याची कधीच कुणी चौकशी करीत नाही. लिखाणाचे अथवा दलालाचे काम करणाऱ्यांच्या हातात हजारो रुपये ठेवले जातात. आज मात्र एसीबीने अयूब आणि भगतच्या मुसक्या बांधल्या. आता ज्यांच्यासाठी २० हजारांची लाच मागण्यात आली, ‘ते साहेब कोण आहेत‘ त्याचीही आम्ही चौकशी करीत असल्याचे एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले.