सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:25 IST2025-10-18T13:24:04+5:302025-10-18T13:25:06+5:30
Nandurbar Accident: ऐन दिवाळीच्या सणात झालेल्या दोन अपघातांमध्ये नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
Nandurbar Accident: दिवाळीचा सण सुरू होत असतानाच, महाराष्ट्र दोन भीषण अपघातांच्या घटनांनी हादरला आहे. नंदुरबार येथील धार्मिक यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोन विदेशी नागरिकांसह एकूण तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एकूण नऊ जणांचा बळी गेल्याने सणासुदीच्या वातावरणावर शोककळा पसरली आहे.
नंदुरबारमध्ये यात्रेकरूंवर काळाचा घाला
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर असलेल्या अस्तंबा ऋषी यांच्या यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला भीषण अपघात झाला. चांदशैली घाटात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी उलटली. हा अपघात इतका भयंकर होता की, सात भाविकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असून, दहाहून अधिक गंभीर जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही यात्रा आदिवासी समुदायासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने, या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तळोदा ते धडगाव रस्त्यावरील चांदसैली घाटात यात्रेसाठी जात असताना व्हॅन चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट घाटाच्या एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर कोसळले. त्यामुळे व्हॅनच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले आणि अनेकांना जबर मार लागला. यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. अनेक लोक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. यापैकी अनेकजण गंभीर जखमी दिसत होते. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.
समृद्धी महामार्गावर विदेशी पाहुण्यांचा अंत
दुसरीकडे जलद प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरही दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर इनोव्हा कार डिव्हायडरला आदळून झालेल्या भीषण अपघातात म्यानमार येथील दोन विदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. यात एका दहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. मुंबईहून नागपूरकडे जात असताना हा अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे कारण समोर आलं आहे. याशिवाय, समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ झालेल्या अन्य एका अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले.
दरम्यान, आधुनिक समृद्धी महामार्गावरही अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही. महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, समृद्धीवर अनेक अपघात हे चालकाला झोप लागल्याने किंवा अतिवेगामुळे होत आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.