इंदापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

By Admin | Updated: June 3, 2014 22:14 IST2014-06-03T20:19:33+5:302014-06-03T22:14:00+5:30

गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली.

Tribute to Gopinath Munde in Indapur | इंदापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

इंदापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

इंदापूर : महाराष्ट्राचा झंझावात शमल्याची भावना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने पूर्ण देशात निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसव प्रदीप गारटकर यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना येथे व्यक्त केली.
गोपीनाथ मुुंडे यांच्या आकस्मिक निधनाने आज सर्वसामान्य इंदापूरकर हेलावून गेला होता. सन १९९०नंतर उत्तरोत्तर इंदापूरकरांशी असणारे नाते दृढ करणारे मुंडे अचानक जगाचा निरोप घेतील, याची इतरांप्रमाणे इंदापूरकरांनीदेखील कल्पना केली नव्हती. सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन नगर परिषदेच्या पटांगणात करण्यात आले आहे, एवढा मोबाईलवरचा एक निरोप या सर्वांना एकत्र घेऊन आला.
या वेळी गारटकर म्हणाले, 'मुंडेंनी ग्रामीण भागात भाजप रुजवला. सामान्यांच्या सुखदु:खांत सहभागी होणारा हा लोकनेता होता. १५ वर्षांच्या अथक संघर्षानंतर दिल्ली ग्रामविकास खात्याचे मंत्रिपद मिळाले. या संधीचे मुंडे सोने करतील, असा विश्वास सर्वसामान्यांना होता. मात्र, देवाला ते मंजूर नव्हते. एका क्षणात सत्काराच्या समारंभाऐवजी पार्थिव देहाचे दर्शन नशिबात आले आहे.'
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माऊली चवरे यांनी, संघर्षमय जीवन जगणारा, इतरांना जगण्याची ताकद देणारा बुलंद आवाज हरपला, अशी श्रद्धांजली वाहिली.
प्रा. कृष्णा ताटे म्हणाले, 'शतकानंतर एखादे संघर्षशील नेतृत्व, सामन्यांच्या हिताला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व निर्माण होते. त्यांचे कार्य पुढे चालविणे हीच आदरांजली ठरेल.'
संघर्ष करणार्‍याला पाठबळ देणारे, प्रस्थापितांना आव्हान देणारे, कार्यकर्त्यांची पारख असणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, असे समाजवादी कार्यकर्ते सलीम शेख म्हणाले.
या वेळी माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर मखरे, अप्पासाहेब जगदाळे, विशाल बोंद्रे, धनंजय बाब्रस, किरण गोफणे, बाबासाहेब चवरे, अमोल मिसाळ, गोरख शिंदे, युवराज पोळ, डॉ. शशिकांत तरंगे, विठ्ठल ननवरे, नीलेश देवकर व इतरांनी श्रद्धांजलिपर भाषणे केली. शिवाजी मखरे यांनी या सभेचे प्रास्ताविक केले.

आजच्या दिवसाची सुरुवात झाली तीच मुळी उदास पावसाळी वातावरणात... सकाळी सहा-साडेसहालाच आभाळ दाटून आले.... रपरप पाऊस कोसळला. तो कोसळण्याआधी व नंतरदेखील वातावरणातील उदासी, थेंबांचा चुटपुटता गहिवर तसाच होता.. वीजपुरवठा खंडित झाला होता. टीव्ही संच बंद असल्याने मिळालेल्या अशुभ बातमीची कुणाला खातरजमा करता आली नाही. अकरा वाजण्याआधी वीज आली अन् लोक टीव्हीशी जखडले गेले.

Web Title: Tribute to Gopinath Munde in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.