त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:27 IST2025-07-03T17:20:11+5:302025-07-03T17:27:48+5:30
Narendra Jadhav News: त्रिभाषा सूत्रासंदर्भातील समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विरोधकांना कानपिचक्या दिल्या.

त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
Narendra Jadhav News:हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. पहिली पासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका राज्यातील अनेक संघटना आणि पक्षांनी घेतलेली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित येऊन यासंदर्भात मोर्चा काढणार होते. परंतु, त्यापूर्वीच सरकारकडून त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर डॉ. नरेंद्र जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पत्रकारांशी बोलताना डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले की, गेल्या ५० वर्षांतील पुणे विद्यापीठातील सर्वांत लोकप्रिय कुलगुरू कोण होते, असे विचारले, तर त्याचे उत्तर आहे, डॉ. नरेंद्र जाधव. त्यानंतर मी प्लानिंग कमिशनमध्ये होतो. भारतीय नियोजन आयोगाचा सदस्य असताना माझ्याकडे शिक्षण, कामगार, रोजगार, कौशल्य, सामाजिक न्याय अशा अनेक विभागांवर मी काम केले आहे. संपूर्ण देशातील शिक्षणाचे काम पाहत होतो. नवीन शैक्षणिक धोरणावर मी काम केलेले आहे. त्यावर आलेला पहिला ग्रंथ माझाच आहे. त्यामुळे मला शिक्षण क्षेत्राचा अनुभव नाही, असे म्हणणे, हे संपूर्णपणे अज्ञानमूलक आहे, असे डॉ. नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले.
माशेलकर समितीच्या अहवालाचा अभ्यास करणार
पत्रकारांशी बोलताना नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली नाही. आमचा केवळ फोनवरून संवाद झाला. माझी संमती सांगितल्यानंतरच अध्यक्षाच्या नावाची घोषणा करण्यात आली. समितीत अनेक लोक असणार आहेत. तीन महिने हातात आहेत. माशेलकर समितीचा अभ्यास करणार आहोत. माशेलकर समितीच्या अहवालाचा अभ्यास करणार आहोत. विरोध करणाऱ्या नेत्यांची बाजू समजून घेऊन अहवाल तयार करणार आहोत. अजून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली नाही. मराठीला प्राधान्य असायला हवे, असे नरेंद्र जाधव यांनी म्हटले आहे.
मराठीला प्राधान्य असलेच पाहिजे
समितीचे अध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली, त्यावेळेस राज ठाकरे यांनी या गोष्टीचे स्वागत केले होते. तुम्ही सुरुवातीला मराठी आहात. त्यामुळे हिंदी सक्ती नको. तुमच्या अहवालात मराठी संदर्भातील गोष्टी येतील, याची काळजी घ्यावी, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते, याकडे पत्रकारांनी नरेंद्र जाधव यांचे लक्ष वेधले. त्यावर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. मराठीतील मी एक मोठा लेखक आहे. मराठीचा मी अभिमानी आहे. मराठीला प्राधान्य असलेच पाहिजे, अशी माझी भूमिका आणि भावना पहिल्यापासूनच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नरेंद्र जाधव भाजपाच्या जवळचे आहेत, असा दावा काही जणांनी केला. यावर बोलताना, मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. राजकीय अनुभव नाही, अशा १२ व्यक्तीची निवड राज्यसभेवर केली जाते. निवड करताना तुम्ही सत्ताधारी गटाच्या बाजूने बसणार की स्वतंत्र बसणार असा पर्याय दिला जातो. माझी निवड झाली, तेव्हा मी भाजपासोबत बसलो नव्हतो. मी स्वतंत्र बाणा ठेवला होता, असे नरेंद्र जाधव म्हणाले.