दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी
By Admin | Updated: November 11, 2015 02:27 IST2015-11-11T02:27:43+5:302015-11-11T02:27:43+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्रीय चाचणी

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी
मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने आज घेतला. उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करून वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करणे
हा या चाचणीचा मुख्य उद्देश
असेल.
विद्यार्थ्याचा कल कोणत्या प्रकारच्या नोकरी वा व्यवसायाकडे आहे या बाबतचा निष्कर्ष सदर चाचणीद्वारे काढण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मदत होईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या मानसशास्रीय कसोट्या निश्चित करण्यात येतील. ही जबाबदारी व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थेची असेल.
ही चाचणी आॅनलाइन २०१५-१६ पासून आॅनलाइन घेण्यात येईल. जिथे आॅनलाइन शक्य नाही तिथे ती आॅफलाइन घेतली जाईल. दहावीनंतर काय असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो. अनेकदा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने स्वत:ला झेपेल वा आवड निर्माण होईल, असा अभ्यासक्रमच आपण निवडला नाही, हे नंतर लक्षात येते पण तोवर वेळ निघून गेलेली असते. या पार्श्वभूमीवर, कलचाचणीच्या उपक्रमातून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करिअरसाठी मिळणार आहे.
दहावीनंतर काय या बाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद; पुणे (विद्या परिषद) येथे हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशनाची व्यवस्था संबंधित विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाणार आहे. मानसशास्रीय चाचण्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शिक्षण आयुक्त; पुणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबळ गट तयार करण्यात
आला आहे.
या मानसशास्रीय कलचाचणीतून दिसून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कलानुसार त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवेश वा मदत करणे ही शासनाची हमी नसेल, असे शालेय शिक्षण विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठीचा संपूर्ण खर्च राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ; पुणे यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. हेल्पलाइन उभारणी, समुपदेशकांचे प्रशिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण आदींसाठी आवश्यक निधी सीएसआर फंडातून उभा करण्याची मुभा विद्या परिषद; पुणे या संस्थेला देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)