सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाची अवस्था ‘तेरे नाम’सारखी करा: आमदार सुरेश धस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:58 IST2025-01-08T12:57:43+5:302025-01-08T12:58:59+5:30
कारवाईच्या मागणीसाठी सरपंच परिषदेचे धरणे

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाची अवस्था ‘तेरे नाम’सारखी करा: आमदार सुरेश धस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कोठडीत कुणालाही भेटू देऊ नका, त्यांची अवस्था ‘तेरे नाम’सारखी करा, सरपंच परिषदेच्या माध्यमातून आपला राग जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन भाजपचे आ. सुरेश धस यांनी केले. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित मोक्का लावावा, या मागणीसाठी सरपंच परिषदेने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले, त्यावेळी ते बोलत होते.
धस म्हणाले की, गावातील मुलांना वाचविण्यासाठी गेलेल्या संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करून खून झाला. त्याचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे या प्रकरणात कितीही वेळ लागला तरी कुटुंबीयांना न्याय मिळवून दिलाच पाहिजे.
राज्यभरातून उपस्थिती
आंदोलनाला राज्यातील शेकडो सरपंच उपस्थित होते. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आश्रय देणाऱ्यांना आरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. देशमुख यांच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी आणि ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्या यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केल्या.
मजकूर न दाखवता सही कशी केली? वकिलाला झापले
सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात विचारात न घेताच आणि मजकूर न दाखवताच माझी सही कशी वापरली? असा सवाल करत संतोष यांचे भाऊ धनंजय यांनी वकिलाला झापले. याचा एक कथित व्हिडीओ कॉल व्हायरल झाला. खोटी स्वाक्षरी करून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, परंतू ती मागे घेतल्याचा दावाही देशमुख यांनी केला आहे.
वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी याचिकेत केली होती तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी या याचिकेत केली होती. परंतु हे सर्व खोटे असून वकिलाने विश्वासात न घेताच केल्याचे कथित व्हिडीओवरून समोर आले आहे. न कळवता वकिलाने स्वतःच याचिका दाखल केली, असा निर्वाळा धनंजय देशमुखांनी केला आहे.