मुंबई महानगरात सात ठिकाणी व्यापार केंद्रे; MMRDA ने तयार केला मास्टर प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 06:21 IST2025-02-10T06:21:37+5:302025-02-10T06:21:57+5:30

मुंबई महानगर प्रदेशाला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या अनुषंगाने निती आयोगाने तयार केलेल्या मास्टर प्लॅनमध्ये १९ ठिकाणी नवीन आर्थिक केंद्रे विकसित करण्याचा विचार आहे

Trade centers at seven locations in Mumbai Metropolitan Region; MMRDA prepares master plan | मुंबई महानगरात सात ठिकाणी व्यापार केंद्रे; MMRDA ने तयार केला मास्टर प्लॅन

मुंबई महानगरात सात ठिकाणी व्यापार केंद्रे; MMRDA ने तयार केला मास्टर प्लॅन

 मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी १९ ठिकाणी विविध प्रकल्प आणले जाणार आहेत. त्यामध्ये सात व्यापार केंद्रांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्याचा आराखडा अंतिम केला आहे.

मुंबई महानगर प्रदेशाला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या अनुषंगाने निती आयोगाने तयार केलेल्या मास्टर प्लॅनमध्ये १९ ठिकाणी नवीन आर्थिक केंद्रे विकसित करण्याचा विचार आहे. त्यामध्ये एमएमआरमध्ये सात ठिकाणी व्यापार केंद्रे विकसित केली जाणार आहेत. यात बीकेसीसह वडाळा फायनन्शियल सेंटर, नवी मुंबई एअरोसिटी, खारघर, कुर्ला आणि वरळी, बोईसर आणि विरार बुलेट ट्रेन स्टेशन, गोरेगाव फिल्म सिटी यांचा समावेश आहे.  

या केंद्रांत काय असेल? 

बीकेसी - ई ब्लॉकमधील २० हेक्टर जागेवर व्यावसायिक, रहिवासी वापरासह हायस्ट्रीट रिटेल, मॉल्स, मनोरंजन आणि रिक्रिएशनल जागा निर्माण केल्या जातील. बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकावर १० हेक्टर जागेवर मिक्स यूज पद्धतीने विकास साधला जाणार आहे. तसेच रिव्हर फ्रंट, रिटेल आणि रेसिडेंशियल स्पेसेस तयार केल्या जाणार आहेत. 

कुर्ला आणि वरळी - कुर्ला येथील १०.५ हेक्टर आणि वरळी येथील ६.४ हेक्टर जागेवर कार्यालये, हॉटेल्स, हॉस्पिटल, मनोरंजन हब, रहिवासी आणि व्यावसायिक जागांचा विकास प्रस्तावित आहे.

वडाळा बिझनेस डिस्ट्रीक्ट  - २० हेक्टर जागेवर फिनटेक, स्टार्टअप, अपार्टमेंट्स, हॉटेल्स या अनुषंगाने विकास केला जाणार आहे.

नवी मुंबई एअरोसिटी - नवी मुंबई विमानतळानजीक २७० हेक्टर जागेवर एअरोसिटी विकसित केली जाईल. यात पंचतारांकित हॉटेल, मनोरंजन केंद्र, प्रदर्शन केंद्र असेल. तसेच छोट्या स्वरुपातील मरिना असेल. 

गोरेगाव फिल्म सिटी - ११० हेक्टर जागेवर मनोरंजन क्षेत्राच्या अनुषंगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या फिल्मसिटीच्या अनुषंगाने उद्योग - व्यवसायांना चालना दिली जाणार आहे.

व्यावसायिक केंद्र - १५० हेक्टर जागेवर व्यावसायिक केंद्र, तसेच मनोरंजन उद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने विकास साधला जाईल.

बोईसर, विरार बुलेट ट्रेन स्टेशन - या दोन बुलेट ट्रेन स्थानकांच्या परिसरात ग्रीनफिल्ड अर्बन क्लस्टर्स उभारली जातील.  

Web Title: Trade centers at seven locations in Mumbai Metropolitan Region; MMRDA prepares master plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.