गुजरातमधील पर्यटकांची कोकणात दादागिरी, कणकवली येथे ग्रामस्थांसोबत हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 10:31 PM2017-10-23T22:31:02+5:302017-10-23T22:32:22+5:30

कणकवली येथून नजीकच असलेल्या वागदे येथील शासकीय दूध डेअरीसमोर गुजरात येथील पर्यटक व वागदेतील ग्रामस्थांमध्ये तुफान हाणामारी झाली.

Tourists in Gujarat fight with villagers in Dadagiri, Kankavli | गुजरातमधील पर्यटकांची कोकणात दादागिरी, कणकवली येथे ग्रामस्थांसोबत हाणामारी

गुजरातमधील पर्यटकांची कोकणात दादागिरी, कणकवली येथे ग्रामस्थांसोबत हाणामारी

कणकवली - येथून नजीकच असलेल्या वागदे येथील शासकीय दूध डेअरीसमोर गुजरात येथील पर्यटक व वागदेतील ग्रामस्थांमध्ये हाणामारी झाली. प्रथम पर्यटकांनी दारू पिऊन हॉटेल मालकास मारहाण केली. हे वृत्त गावात समजताच ग्रामस्थांनी पर्यटकांना चोप दिला. यामध्ये ८ पर्यटक जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. तर ग्रामस्थांमधील दोघेजण गंभीर असून त्यांना गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.  ही घटना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. 
गुजरातवरून आलेली पर्यटकांची बस गोव्याला जात होती. त्यातील पर्यटक वागदे येथील शासकीय दूध डेअरीसमोर जेवण करीत होते. या पर्यटकांपैकी काहीजण तेथील नजीकच्या हॉटेलात शीतपेय पिण्यासाठी गेले व येताना दारू पिऊन आले. दारूच्या नशेत धिंगाणा घालत हे पर्यटक हॉटेल मालकाजवळ आले. हॉटेल मालकाने त्यांना ग्लास धुऊन ठेवायला सांगितले. यावरून हॉटेल मालक व पर्यटक यांच्यात बाचाबाची झाली व पर्यटकांनी हॉटेल मालकास मारहाण केली. 
हॉटेल मालकास मारहाण झाल्याचे समजताच वागदे गावचे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी पर्यटकांना चोप दिला. यामध्ये रेखाबेन संजय चौहान (२३), रतनबेन कानजी (७५), रमेश कानजी (५८), लालजीभाई (४६), राजेश गुलाबभाई चौहान (३५), हितेश गुलाबभाई चौहान (३६), जातने लालजीभाई चौहान (४६), नवलभाई लालजीभाई चौहान (७५, सर्व राहणार सौगणनगर, नोसावला, गुजरात) हे पर्यटक जखमी झाले. त्यांना प्रथम येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 
 
दोन ग्रामस्थ गंभीर जखमी
यातील पर्यटकांनी राजाराम भागोजी ताटे (रा. वागदे) व विजय अंकुश पांगम (बांदकरवाडी-कणकवली) या दोघांना मारहाण केली. या मारहाणीत या दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. 
 
ग्रामस्थ संतप्त 
याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वागदे ग्रामस्थांनी पोलीस स्थानक व उपजिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. पर्यटकांनी कारण नसताना हॉटेल मालकास मारहाण केल्याबद्दल वागदे ग्रामस्थ संतप्त झाले होते. पर्यटक भाजप गटाचे असल्याचे भासवून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र ग्रामस्थांनी पर्यटकांच्या या कृतीचा निषेध केला आहे. 
 

Web Title: Tourists in Gujarat fight with villagers in Dadagiri, Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.