एसटीचे ११६ कर्मचारी बडतर्फ; आतापर्यंत एकूण १०,७६४ कर्मचाऱ्यांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 05:44 IST2021-12-31T05:44:20+5:302021-12-31T05:44:47+5:30
ST employees : एसटी महामंडळाने आतापर्यंत एकूण १०,७६४ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून, ७१९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

एसटीचे ११६ कर्मचारी बडतर्फ; आतापर्यंत एकूण १०,७६४ कर्मचाऱ्यांचे निलंबन
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे वारंवार आवाहन करूनही कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे एसटी महामंडळ त्यांच्यावर कारवाई करत आहे. गुरुवारी राज्यात एसटी महामंडळाच्या वतीने ११६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले.
एसटी महामंडळाने आतापर्यंत एकूण १०,७६४ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून, ७१९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. गुरुवारी संपूर्ण राज्यात एकूण १६९ एसटी डेपो अंशतः चालू करण्यात आले होते, तर ८१ एसटी डेपो १०० टक्के बंद होते, तर गुरुवारी राज्यात कामावर हजर कर्मचाऱ्यांची संख्या एकूण २३,७७५ एवढी होती. सरकारने आमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली तरी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असे संपकरी कामगारांचे म्हणणे आहे.