टोल नाक्यांवर आता सुरू राहणार ध्वनिफीत
By Admin | Updated: June 10, 2016 02:00 IST2016-06-10T02:00:25+5:302016-06-10T02:00:25+5:30
टोल नाक्यांवर ‘लेनची शिस्त पाळा, अतिवेगाने वाहन चालवू नका’ अशा आशयाची ध्वनिफीत सुरू राहणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते, एकनाथ शिंदेंनी दिली

टोल नाक्यांवर आता सुरू राहणार ध्वनिफीत
मुंबई : राज्यातील महामार्गांवर वाढत्या अपघातांचे प्रमाण पाहता येथील टोल नाक्यांवर ‘लेनची शिस्त पाळा, अतिवेगाने वाहन चालवू नका’ अशा आशयाची ध्वनिफीत सुरू राहणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तरीत्या प्रसारमाध्यमांना दिली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याकरिता दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महामार्गावरील विशेष मोहिमेची पाहणी केली. या वेळी ते बोलत होते.
येथील विशेष मोहीम आठवडाभर सुरू राहणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. एकनाथ शिंदे यांनी या वेळी मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला ट्रॉमा केअरचा प्रश्न २१ जून रोजी सिद्धिविनायक ट्रस्टच्या बैठकीत मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच मुंबई आणि पुण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक ट्रॉमा सेंटर उभारण्यात येईल आणि एअर अॅम्ब्युलन्स प्रश्नही मार्गी लावण्यात येईल, असेही शिंदे यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
>मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत काही तासांत शेकडो वाहनांवर कारवाई करण्यात आली. लोधिवली, बोरघाट, खंडाळा, वडगाव येथील चार केंद्रांवर १२६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. २० ट्रक जप्त करण्यात आले. या कारवाईत हलगर्जीपणा बाळगण्यात आला तर संबंधित अधिकारी वर्गावरही कारवाई केली जाईल. शिवाय इंटेलीजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या मदतीने महामार्ग सुरक्षित करण्यात येणार आहे. - दिवाकर रावते
महामार्गांवरील काही ठिकाणी दोन्ही बाजूला मेटल बीम क्रॅश बॅरिअर लावण्यात आले आहेत. हे बॅरिअर दुरुस्तीच्या दृष्टीने खर्चीक आहेत. यावर उपाय म्हणून बायफ्रेन वायरचे कवच महामार्गावर लावण्यात येईल. विदेशातील महामार्गावर ही वायर वापरण्यात येते. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवण्यात आल्यानंतर ही वायर संपूर्ण महामार्गावर लावण्यात येईल.
- पी.एस. मंडपे (सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ)