‘एमएसआरडीसी’च्या रस्त्यांवर १ एप्रिलपासून ‘फास्टॅग’द्वारेच टोल; रोखीने टोल भरणाऱ्यांकडून दुप्पट पैसे घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:13 IST2025-03-18T12:13:09+5:302025-03-18T12:13:27+5:30
वाहनचालकांनी आर्थिक भुर्दंडापासून वाचण्यासाठी फास्टॅग स्टीकर खरेदी करावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

‘एमएसआरडीसी’च्या रस्त्यांवर १ एप्रिलपासून ‘फास्टॅग’द्वारेच टोल; रोखीने टोल भरणाऱ्यांकडून दुप्पट पैसे घेणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील टोल नाक्यांवर १ एप्रिलपासून ‘फास्टॅग’द्वारेच वाहनांना टोल भरावा लागणार आहे.
रोखीने अथवा क्यूआर कोड आदी माध्यमांतून टोल भरणाऱ्यांकडून नियमित शुल्काच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एमएसआरडीसीकडून टोल नाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत ‘एमएसआरडीसी’कडून फास्टॅगच्या जोडीला हायब्रीड पद्धतीनेही टोल वसुली केली जाते. त्यामध्ये रोख, स्मार्ट कार्ड, पीओएस, डेबिट कार्ड, क्यूआर कोड आदींचा समावेश आहे. त्यामुळे टोल नाक्यांवर फास्टॅग मार्गिकांसोबतच दोन मार्गिका या हायब्रीड टोल वसुलीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र १ एप्रिलपासून या हायब्रीड मार्गिका बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे एमएसआरडीसीमार्फत टोल वसुली होणाऱ्या नऊ रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर केवळ फास्टॅगमार्फतच टोल वसुली होईल.
त्यामुळे हायब्रीड मार्गिका ३१ मार्चला रात्री १२ वाजेपासून बंद केल्या जाणार आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच फास्टॅग नसलेल्या
वाहनांकडून दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे.
वाहनचालकांनी आर्थिक भुर्दंडापासून वाचण्यासाठी फास्टॅग स्टीकर खरेदी करावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
सध्याचे फास्टॅगद्वारे टोलभरणा प्रमाण
८५-९०% सद्य:स्थितीत एमएसआरडीसीच्या टोल नाक्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांपैकी जवळपास ८५ ते ९० टक्के वाहनांकडून फास्टॅगद्वारे टोल भरला जातो.
या टोल नाक्यांवर फास्टॅग मस्ट
१. वांद्रे वरळी सागरी सेतू
२. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई पुणे जुना मार्ग
३. मुंबई प्रवेशाद्वारावरील ५ टोल नाके
४. समृद्धी महामार्गावरील २३ टोल नाके
५. नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील ५ टोल नाके
६. सोलापूर शहर एकात्मिक रस्ते
विकास प्रकल्पातील
४ टोल नाके
७. संभाजीनगर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील ३ टोल नाके
८. काटोल बायपास
९. चिमुर वरोरा वणी