आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:29 IST2025-11-01T16:23:27+5:302025-11-01T16:29:15+5:30
एखादा आरोप सिद्ध करून कुणी दाखवला त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. याचा अर्थ शासन या सगळ्याला संरक्षण देत आहे असा आरोप पवारांनी केला.

आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
मुंबई - आजच्या मोर्चाने जुन्या घटना आठवल्या. महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रासाठी असे मोर्चे निघाले. काळा घोडा आणि परिसरात असणारे हे मोर्चे एकप्रकारचा इतिहास घडवणारे मोर्चे होते. त्या मोर्चानंतर आज इतक्या मोठ्या संख्येने जी एकजूट लोकांनी या मोर्चात दाखवली ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देणारी आहे असं शरद पवारांनी म्हटलं. विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या सत्याच्या मोर्चात ते सहभागी झाले होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, आपण एक महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे. आम्ही स्वत:साठी काहीही मागत नाही. लोकशाहीत संविधानाने जो अधिकार सगळ्यांना दिला आहे त्याचे जतन करण्याची वेळ आली आहे. निवडणुका झाल्या, त्यात विशेषत: विधानसभा निवडणुकीत जे काही प्रकार घडले त्यामुळे सामान्य माणसांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासाला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. सोलापूरचे आमदार उत्तम जानकर यांनी त्यांचे अनुभव तुम्हाला सांगितले. सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जात आहे. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकीत संघर्ष असू शकतो परंतु या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावे लागेल. या देशातील मतांचा अधिकार, लोकशाहीचा अधिकार जतन करणे हे आमचे कर्तव्य आहे असा निर्धार केला पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच काही ठिकाणी लोक तक्रारीसाठी पुढे आले. बनावट आधार कार्ड बनवले जाते अशी माहिती दिली, त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सिद्ध करून दाखवा असं आव्हान दिले. जेव्हा बनावट आधार कार्ड दाखवून दिले. त्यानंतर ज्याने हा आरोप सिद्ध करून दाखवला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हा कुठला न्याय..जर एखादा आरोप सिद्ध करून कुणी दाखवला त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. याचा अर्थ शासन या सगळ्याला संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी आहे. काहीही करा परंतु आम्ही या मतदानातील चोरी थांबवणार असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
दरम्यान, आज इथे असणाऱ्या अनेक पक्षाची विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेदही असतात. पण आज देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल. मतांचा अधिकार टिकवायचा असेल आपल्याला एक व्हावे लागेल असं आवाहन शरद पवारांनी लोकांना केले.