"या लोकांना 'दादा' गेल्याचं दुःख नाही, VSR कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी..."; रोहित पवारांचा खळखळबजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:03 IST2026-02-18T11:26:49+5:302026-02-18T13:03:56+5:30
अपघातग्रस्त VSR कंपनीवर का कारवाई होत नाही याचा शोध आम्ही घेतला तेव्हा अनेक माहिती समोर आली

"या लोकांना 'दादा' गेल्याचं दुःख नाही, VSR कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी..."; रोहित पवारांचा खळखळबजनक आरोप
मुंबई - लिअरजेट विमान भारतात नोंदणी होऊ शकत नाही. परंतु DGCA अधिकाऱ्यांशी संगनमत करून काहींनी या विमान कंपनीची नोंदणी भारतात केली. हे विमान अमेरिकेतील कंपनीकडून विकत घेतले होते. ४ ते ५ वेळा या विमानाची खरेदी विक्री झाली होती. नियम डावलून या विमानाचं भारतात रजिस्ट्रेशन कसं करण्यात आले असा सवाल करत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून खळबळजनक आरोप केले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
रोहित पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विमान अपघातात तपासातील बारकावे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. रोहित पवार म्हणाले की, एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात होऊन तपास करणारे अधिकारी संध्याकाळी तिथे पोहचले होते. लिअरजेट विमान नेमकं कसे असते, त्यात काय तंत्रज्ञान आहे याबाबत तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना माहिती नव्हते. आमच्यासारखा विना सत्तेचा माणूस इतकी माहिती बाहेर काढू शकतो, मग इतकी यंत्रणा असूनही तपास पुढे का जात नाही. १५ फेब्रुवारीपर्यंत अपघाताचा अहवाल दिला जावा असा आदेश काढला होता. मग त्याचे काय झाले? असं त्यांनी विचारले.
VSR कंपनीवर का कारवाई होत नाही?
अपघातग्रस्त VSR कंपनीवर का कारवाई होत नाही याचा शोध आम्ही घेतला तेव्हा अनेक माहिती समोर आली. VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात कोण कोण गेले होते याचे फोटो आहेत. त्यात आपल्या राज्याचे सत्ताधारी नेते लग्नाला गेले होते. VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंगच्या मुलाच्या लग्नासाठी आंध्र प्रदेशच्या टीडीपी पक्षाचे प्रमुख नेतेही गेले होते. सत्तेतले बरेच नेते VSR कंपनीतील मालकाशी निगडीत आहेत. त्यात टीडीपीचे नेतेच नागरी वाहतूक उड्डाण मंत्री केंद्रात आहेत. ज्या कंपनीच्या माध्यमातून हा विमान अपघात झाला त्याचा मालक आज भारतात नाही. VSR कंपनीला मुद्दामाहून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजितदादा गेले याचे दु:ख सत्तेतला माणसांना नाही परंतु VSR मालकाला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे असा आरोप रोहित पवारांनी केला. काही लोक मुद्दामाहून यात राजकारण आणतायेत, गुंतवणूकदार कोण आहेत हेदेखील आम्हाला माहिती आहे. १००-२०० कोटींसाठी तपासात हस्तक्षेप करण्याचं काम करू नका कारण आमचा काका या अपघातात गेला आहे असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, VSR कंपनीचा मालक विजय सिंग यांचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे. त्यांचा मुलगा रोहित सिंग यालाही शोधा. अजितदादांच्या घातपातीचा मुद्दा मी मांडतोय, पण मला भाजपाच्या लोकांकडून ट्रोल का केले जात आहे? समित ठक्कर नावाचा व्यक्ती आहे त्याने एक ट्रोल केले होते. त्यानेच २८ फेब्रुवारीच्या अपघाताच्या २ दिवस आधीच एक ट्विट केले होते. राज्यात एक अशी घटना घडणार आहे ज्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप येईल असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं होते. मात्र काही वेळात त्याने हे ट्विट डिलिट केले होते. त्यामुळे मला ट्रोल करणाऱ्यांबाबत लोकांना संशय यायला लागला आहे असंही रोहित पवारांनी म्हटलं.