मनसेच्या भाजपाधार्जिण्या भूमिकेला कंटाळलेले; माजी आमदार शरद पवारांच्या गटात
By संजय पाठक | Updated: September 10, 2023 19:04 IST2023-09-10T18:55:29+5:302023-09-10T19:04:21+5:30
नाशिकमध्ये लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा हाेणार आहे. त्यावेळी अन्य समर्थक प्रवेश करणार असल्याचे नितीन भोसले यांनी सांगितले.

मनसेच्या भाजपाधार्जिण्या भूमिकेला कंटाळलेले; माजी आमदार शरद पवारांच्या गटात
नाशिक- आधी भाजपाच्या विरोधात लढण्याचा निर्धार करून नंतर भाजपाच्या महापौरपदासाठी मतदान करण्याचा आग्रह धरणाऱ्या मनसे नेत्यांना कंटाळून सध्या तटस्थ असलेले नाशिक पश्चीम मतदार संघाचे माजी आमदार नितीन भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटात प्रवेश केला आहे.
आज मुंबईत त्यांनी हा प्रवेश केला असून नाशिकमध्ये लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा हाेणार आहे. त्यावेळी अन्य समर्थक प्रवेश करणार असल्याचे नितीन भोसले यांनी सांगितले. नितीन भाेसले हे २००६ पासून मनसेत काम करीत होते. आठ वर्षे शहराध्यक्ष होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत मनसेचे तीन आमदार नाशिक शहरात निवडून आले होते. त्यात नितीन भोसले हे पश्चीम नाशिक मतदार संघातून निवडून आले हेाते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्येही त्यांनी निवडणूक लढवली मात्र, त्यांना यश आले नव्हते. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मध्यंतरी भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र, नाशिक महापालिकेत महापौरपदाच्या निवडणूकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी भेट झाल्यानंतर वातावरण बदलले आणि भाजप उमेदवार सतीश कुलकर्णी यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे नितीन भोसले यांनी नाराज होऊन तटस्थ राहणे पसंत गेले हेाते.
मध्यंतरी ते शिवसेनेत प्रवेश करणार होते, मात्र हा विषय मागे पडला होता. त्यानंतर आता त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.