ऐरोली येथील तिघे अजूनही बेपत्ता
By Admin | Updated: August 2, 2016 05:29 IST2016-08-02T05:29:12+5:302016-08-02T05:29:12+5:30
गटारी साजरी करण्यासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथून अंबाडीजवळील चिरंबे येथे आलेले तिघे जण रविवारी दुपारी भातसा नदीत बुडाले

ऐरोली येथील तिघे अजूनही बेपत्ता
वज्रेश्वरी : गटारी साजरी करण्यासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथून अंबाडीजवळील चिरंबे येथे आलेले तिघे जण रविवारी दुपारी भातसा नदीत बुडाले होते. अग्निशमन दल, पोलीस स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेत आहेत. परंतु, सोमवारी सायंकाळपर्यंत ते सापडलेले नाहीत.
अंबाडीजवळील चिरंबे येथे एका नातेवाइकाच्या फार्महाऊसवर ऐरोली येथील ६ मित्र आले होते. रविवारी दुपारी जेवण झाल्यावर जवळच असलेल्या तानसा नदीवर ते अंघोळीसाठी गेले होते. तेथील एका खडकावर ते बसले असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात बबन मढवी (४५), विलास जोशी (४२), देविदास पाटील (३८) हे तीन जण वाहून गेले. तर रवी मढवी, राजा कोटकर, परशुराम म्हात्रे हे वेळीच पोहून बाहेर आल्याने बचावले. या घटनेची माहिती गणेशपुरी पोलिसांना समजताच त्यांनी स्थानिक तरु णांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. भिवंडी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनीही रात्री उशिरापर्यंत त्यांचे शोधकार्य सुरू ठेवले. मात्र, ते सापडले नाहीत.
सोमवारी सकाळी भिवंडी आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या १२ ते १५ जणांच्या चमूने स्थानिक तरु णांच्या मदतीने अंबाडी ते अकलोली गणेशपुरीपर्यंत शोध घेतला. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत वाहून गेलेल्या एकही जणाचा शोध लागला नाही. घटनास्थळी वाहून गेलेल्यांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)