घुमणारी समुद्री गाज आणि दोन खळाळत्या तरुण नद्यांचा सन्मान; यंदा देशात सहा ठिकाणी रंगणार सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:11 IST2025-03-20T11:10:41+5:302025-03-20T11:11:15+5:30

२२ मार्चला नागपुरातून प्रारंभ : लिजंड, आयकॉन पुरस्कारांनी दिग्गजांचा गौरव...

This year, the Surajyotsna National Music Awards ceremony will be held at six locations across the country | घुमणारी समुद्री गाज आणि दोन खळाळत्या तरुण नद्यांचा सन्मान; यंदा देशात सहा ठिकाणी रंगणार सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा 

घुमणारी समुद्री गाज आणि दोन खळाळत्या तरुण नद्यांचा सन्मान; यंदा देशात सहा ठिकाणी रंगणार सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा 


नागपूर : एकीकडे थेट 'पांढरी चार'चा उंचावरचा स्वर लीलया लावणारा, ग्वाल्हेर घराण्याची लखलखती शागीर्दी तरुण खांद्यांवर आत्मविश्वासाने पेलणारा अनिरुद्ध ऐथल आणि दुसरीकडे इन्फ्ल्यूएंसर्सच्या दुनियेत धूम मचवून   असणाऱ्या अंतरा व अंकिता या  नंदी भगिनी... एकीकडे घराणेदार भारतीय शास्त्रीय संगीताचा आदबशीर खानदानी वारसा आणि दुसरीकडे शास्त्रीय संगीत शिक्षणाच्या भरजरी वस्त्राला पॉप-कल्चरची लहरेदार झूल लावण्याचे धमाकेदार कसब... अगदी वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या सांगीतिक प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन उमलत्या तरुण संगीत प्रतिभांचा सन्मान या वर्षी होतो आहे 'सूरज्योत्स्ना'च्या मंचावर!

 ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त ‘लोकमत समूहा’च्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘सूरज्याेत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याचा यंदा, बाराव्या वर्षी देशभर विस्तार करण्यात आला असून, नागपूर, मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू व यवतमाळ अशा सहा ठिकाणी पुरस्कार वितरण होणार आहे. २२ मार्च ते २५ एप्रिल अशा महिनाभरापेक्षा अधिक काळ चालणाऱ्या या बहारदार मैफलीची सुरूवात नागपुरातून होईल. 

संगीत क्षेत्रातील युवा आणि बहुमुखी प्रतिभांचा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात केला जातो. बंगळुरूचा तरुण प्रतिभावान हिंदुस्थानी शास्त्रीय गायक अनिरुद्ध ऐथल आणि गाण्याच्या सादरीकरणातून सोशल मीडियात धमाल उडविणाऱ्या कोलकात्याच्या अंतरा व अंकिता नंदी  ‘सूरज्याेत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०२५’ चे विजेत्या आहेत.

यंदाच्या या पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे यवतमाळ वगळता अन्य पाच सोहळ्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘लिजंड’ व ‘आयकाॅन’ पुरस्काराने ख्यातनाम कलावंतांना गौरविले जाणार आहे. नागपुरातील सुरेश भट सभागृहात होणाऱ्या पहिल्या समारंभात ख्यातनाम गायिका उषा मंगेशकर यांना  ‘लिजंड’   तर सुप्रसिद्ध गझल गायक तलत अझीझ यांना ‘आयकाॅन’ पुरस्काराने गौरविण्यात येईल. प्रख्यात सतार वादक शुजात हुसेन खान यांचे सुफी गायन हे या सोहळ्याचे खास आकर्षण आहे. 

सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार मालिका 
नागपूर : २२ मार्च 
सुरेश भट सभागृह, नागपूर यवतमाळ : २३ मार्च : 
शक्तिस्थळ, यवतमाळ (दोन्ही ठिकाणी संगीतकार, प्रख्यात सतार वादक शुजात खान).   ‘लिजंड’  
 - गायिका उषा मंगेशकर, आयकॉन - गझलगायक तलत अझीझ
मुंबई : २८ मार्च 
एनसीपीए (टाटा थिएटर) मुंबई (सुफी जाझ प्रस्तुत लुईस बॅंक्स, पूजा गायतोंडे, जीनो बॅंक्स, सेल्डन डिसिल्व्हा, हर्ष भावसार, जयंती गोसेर, उन्मेश बॅनर्जी).  ‘लिजंड’   
- गीतकार जावेद अख्तर, आयकॉन - गायक नितीन मुकेश
पुणे : २९ मार्च 
महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे (सूरज्योत्स्ना बँड, सादरीकरण आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, हरगुन कौर, मेहताब अली, एस. आकाश, रमाकांत गायकवाड, शिखर नाद कुरेशी).  ‘लिजंड’   - गायक 
पं. उल्हास कशाळकर, आयकॉन 
- तबलावादक विजय घाटे 
नवी दिल्ली : १२ एप्रिल 
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ऑडिटोरिअम, नवी दिल्ली (प्रसिद्ध पार्श्वगायक मामे खान, राजस्थान).  आयकॉन - गायिका अनिता सिंघवी
बंगळुरू : २५ एप्रिल 
प्रेस्टिज सेंटर परफार्मिंग आर्ट, बंगळुरू (सूरज्योत्स्ना बँड).  ‘लिजंड’   - गायिका कविता कृष्णमूर्ती, आयकॉन - संगीतकार रिकी केज

Web Title: This year, the Surajyotsna National Music Awards ceremony will be held at six locations across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.