"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:21 IST2025-07-22T19:07:07+5:302025-07-22T19:21:31+5:30
Maharashtra News: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा भाषावाद पेटलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या भाषावादाबाबत, मोठं विधान केलं आहे.

"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्येमराठी विरुद्ध हिंदी असा भाषावाद पेटलेला आहे. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे हा वाद भडकला होता. तसेच अखेरीस जनक्षोभामुळे सरकारला पहिलीपासून मराठी शिकवण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला होता. दरम्यान, आता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या भाषावादाबाबत मोठं विधान केलं आहे. आपण अशाप्रकारे द्वेष पसरवत राहिलो तर इथे येऊन कोण गुंतवणूक करणार, यामधून आपण राज्याचं दीर्घकालीन नुकसान करत आहोत. आपल्याला मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे. तसेच आपण अधिकाधिक भाषा शिकल्या पाहिजेच असे राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे.
एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना तामिळनाडूमधील एका घटनेची आठवण सांगत राधाकृष्णन यांनी भाषावादावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी तामिळनाडूमधून खासदार होतो, तेव्हा एकेदिवशी मी काही लोक कुणाला तरी मारहाण करत असल्याचे पाहिले. मी त्यांना त्यांची अडचण विचारली तेव्हा ते हिंदीत बोलत असल्याचे समजले. मग ते लोक तामिळ भाषेत बोलत नव्हते. तसेच तामिळ भाषेत बोलावं यासाठी त्यांना मारहाण करण्यात येत होती, असे मला हॉटेल मालकाने सांगितले.
#WATCH | Mumbai, Maharashtra: On the Marathi language row, Maharashtra Governor CP Radhakrishnan says, "... When I was an MP in Tamil Nadu, one day I saw some people beating someone... When I asked them the problem, they were speaking in Hindi. Then, the hotel owner told me that… pic.twitter.com/mkLtdAO3Bx
— ANI (@ANI) July 22, 2025
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन पुढे म्हणाले, जर आपण अशाप्रकारे द्वेष पसरवला. तर इथे येऊन कोण गुंतवणूक करणार? अशाने आपण महाराष्ट्राचं दीर्घकालीन नुकसान करत आहोत. मला हिंदी भाषा समजत नाही. माझ्यासाठी हा एक अडथळा आहे. आपण अधिकाधिक भाषा शिकल्या पाहिजेत. तसेच आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात भाषावाद तीव्र झाला असताना राज्यपालांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण असून, त्यावर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.