Amit Deshmukh Ajit Pawar NCP: 'इतकं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे. तो योग कसा येणार हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही सगळे सुद्धा वाट बघताहेत की भय्या कधी उडी घेणार', असे विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी केले. लातुरमध्ये आयोजित कार्यक्रमात हे विधान केले आणि त्याची बरीच चर्चा रंगली आहे. त्यावर अमित देशमुख यांनीही उत्तर दिले.
विक्रम काळेअमित देशमुखांबद्दल काय बोलले?
लातुरमधील कार्यक्रमात बोलताना आमदार विक्रम काळे म्हणाले, "अमित देशमुख हे २०२३ मध्ये सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनी फेस्टिव्हलची सुरूवात केली. ते आज मंत्री नाहीत, तरीसुद्धा ही परंपरा कायम ठेवण्याचं काम अमित देशमुखांनी केलेलं आहे. एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे, ही आमची आणि संजय बनसोडेंची खूप इच्छा आहे."
"मी त्यांच्या पलीकडून बसलो, अलिकडून संजय बनसोडे बसलेले आहेत. गरज पडली तर जब्बार पटेल कानात सांगायला बसलेले आहेत. त्यामुळे हा योग सुद्धा लवकर यावा. आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्र्यांनी हा फेस्टिव्हल आयोजित केलाय, असे बघण्याचा योग लातुरकरांना यावा. तो कसा येणार हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही सगळे सुद्धा वाट बघताहेत की भय्या कधी उडी घेणार. तो योग येईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो", असे विधान आमदार विक्रम काळे यांनी केले.
अमित देशमुख राष्ट्रवादीच्या ऑफरवर काय बोलले?
आमदार अमित देशमुख म्हणाले, "विक्रम काळे, दरवेळेला एका नव्या चित्रपटाची ते निर्मिती इथे येऊन करतात. त्याचं सगळंच, मग ते दिग्दर्शन,निर्मिती, पटकथा, अभिनय सगळं तेच करतात. हे त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. पण, मला असं वाटतं की, जसा सामाजिक समतोल असला पाहिजे. तसा राजकीय समतोल सुद्धा हा असला पाहिजे."
"तराजू प्रमाणे सगळेच जर तिथे जाऊन बसले, तर... त्यामुळे तो समतोल राखण्याचे काम लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतं. शेवटी महायुती आणि महाविकास आघाडी. तुम्ही जिंकलात, पण महाविकास आघाडीलाही ज्यांनी मते दिलेली आहेत, त्या मतांचा आदर सुद्धा करणं हे आमचं काम आहे. जिथे आहोत तिथे आनंदी आहोत. भविष्यात तुम्हीच कदाचित इकडे याल. असं होऊ शकतं. काळ बदलतो, राजकीय परिस्थिती बदल राहते", असे अमित देशमुख म्हणाले.