“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 20:22 IST2025-12-18T20:18:12+5:302025-12-18T20:22:17+5:30
BJP Raosaheb Danve News: या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपापल्या सोईने दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढवत आहे, असा दावा भाजपा नेत्यांनी केला.

“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
BJP Raosaheb Danve News: मागच्या निवडणुकीचा मी साक्षीदार आहे. त्या काळात मी भाजपाचा अध्यक्ष होतो. निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर जे काही आकडे समोर आले, त्यातून मुंबईचा महापौर करण्याएवढ्या जागा भाजपाच्या आल्या होत्या. परंतु, त्या वेळेस आम्ही एकत्र सरकार चालवत होतो, त्यामुळे आमच्या नेतृत्वाने निर्णय केला की, इतके वर्ष महापालिका त्यांच्याकडे आणि आम्ही एकत्र सरकार चालवत आहोत, तेव्हा त्यांच्याकडे महापालिका राहू द्यावी. म्हणून महापालिका त्यांच्याकडे ठेवली गेली. अन्यथा मागच्याच काळात ही महापालिका भाजपाकडे आली असती, असे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले.
मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केला. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत जशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या, तशाच आता महापालिका निवडणुकांतही होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. यातच ठाकरे बंधूंकडून अधिकृत युतीची घोषणा अद्याप झाली नसली तर महापालिका निवडणुकीसाठी चर्चा सुरू झाल्या आहेत. अंतिम निर्णय झाल्यावर घोषणा केली जाईल, असे ठाकरे गटाचे नेते सांगत आहेत. यावर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
त्यांचा पक्ष पुढच्या निवडणुकीला राहणार नाही
पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी ठाकरे बंधू एकत्र निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या मोठ्या महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आणि मला खात्री आहे की, ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी भाजपाची संगत सोडून हिंदुत्वाला सोडले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी संगत केली, त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता. त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसला. ही निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपापल्या सोईने दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढवत आहे. हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला राहणार नाही, असा मोठा दावा दानवे यांनी केला.
दरम्यान, ठाकरे बंधूंचे पक्ष वेगवेगळे आहेत, ते दोघेही आपापल्या पक्षाचे नेतृत्व करतील. परंतु, नेमकेपणाने उद्धव ठाकरेंबाबत सांगायचे झाले, तर उरलेसुरले कार्यकर्ते महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ राहणार नाही. कार्यकर्ते आपले भविष्य शोधतील. आपला पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वासच कार्यकर्त्यांमध्ये नाही, असेही दानवे म्हणाले.