"जनतेच्या घामाचा पैसा ‘मित्रों’च्या खिशात घालणारा पंतप्रधान देशाला प्रथमच लाभला" , नाना पटोलेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 19:08 IST2023-09-04T19:08:22+5:302023-09-04T19:08:47+5:30
Nana Patole Criticize Narendra Modi: सातत्याने खोटं बोलणारा पंतप्रधान देशाला प्रथमच लाभला हे देशाचे दुर्दैव आहे. सर्वसामान्य जनतेच्या घामाचा पैसा मित्रोंच्या खिशात घालण्याचे एकमेव काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

"जनतेच्या घामाचा पैसा ‘मित्रों’च्या खिशात घालणारा पंतप्रधान देशाला प्रथमच लाभला" , नाना पटोलेंची बोचरी टीका
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मागील ९ वर्षात जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ मुठभर उद्योगपती मित्रांसाठीच काम केले आहे. सातत्याने खोटं बोलणारा पंतप्रधान देशाला प्रथमच लाभला हे देशाचे दुर्दैव आहे. सर्वसामान्य जनतेच्या घामाचा पैसा मित्रोंच्या खिशात घालण्याचे एकमेव काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
जनसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नाना पटोले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून केली. यावेळी वरोरा-भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि हजारोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाली होती.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या काळात महागाईवर नियंत्रण मिळवण्यात आले होते, गरिबीचे प्रमाण कमी करण्यात यश आले होते. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकाराने शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले पण मागील ९ वर्षापासून केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून महागाई प्रचंड वाढली, बेरोजगारीत वाढ झाली, शेती व शेतकऱ्याला संपवण्याचे काम सुरु आहे. संविधानिक संस्था संपवण्याचे काम केले जात आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड नाराजी असून भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याची भावना जनतेमध्ये दिसून येत आहे.