"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:19 IST2025-07-16T10:17:54+5:302025-07-16T10:19:01+5:30
सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं.

"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
मुंबई - मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू युतीच्या चर्चांना उधाण आले. त्यातच मनसेने इगतपुरी येथे राज्यस्तरीय शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिरातून युतीबाबत राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुका आल्यावर ठरवू असं विधान केल्याच्या बातम्या झळकल्या. या वृत्तामुळे ठाकरे बंधू युतीबाबत सस्पेन्स निर्माण झाला. त्यात आता खुद्द राज ठाकरे यांनी यावर भाष्य करत पत्रकारांवर संतापले आहेत.
राज ठाकरे यांनी पत्रक काढत म्हटलंय की, १४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं. त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला.
सस्नेह जय महाराष्ट्र,
— Raj Thackeray (@RajThackeray) July 16, 2025
१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी…
तसेच कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाईम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं.
दरम्यान, नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल. पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा १९८४ पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे, पत्रकारिता ही मी खुप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे. त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका. मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन असं राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले.