चोर समजून मारहाण; एकाचा मृत्यू, बोरीवलीतून तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 06:29 IST2017-11-24T06:28:37+5:302017-11-24T06:29:07+5:30

मुंबई : चोर समजून एका तरुणाला झाडाला बांधून मारहाण करीत हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर पश्चिम परिसरात उघडकीस आला आहे.

Thieves understand the thief; One killed, three held by Borivali | चोर समजून मारहाण; एकाचा मृत्यू, बोरीवलीतून तिघांना अटक

चोर समजून मारहाण; एकाचा मृत्यू, बोरीवलीतून तिघांना अटक

मुंबई : चोर समजून एका तरुणाला झाडाला बांधून मारहाण करीत हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर पश्चिम परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुरुवारी तिघा जणांना अटक केली असून, मृत तरुणाची ओळख पटलेली नाही.
ओम्कार सावंत, प्रदीप कांबळे आणि सत्या मूर्ती नायर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी तरुणाला बेदम चोप देत बोरीवलीतील गोखले महाविद्यालयाच्या परिसरात फेकून दिले होते. पोलीस नियंत्रण कक्षात बुधवारी रात्री नागरिकाने एक तरुण मृतावस्थेत पडला असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. शरीरावर गंभीर जखमा असल्याने मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाला बोरीवलीतील धर्मानगर परिसरात एका तरुणाला विचारे कम्पाउंड परिसरात झाडाला बांधून मारले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरातून माहिती घेऊन तिघांना अटक केली. त्यांनी चोर समजून बुधवारी रात्री या तरुणाला मारल्यानंतर एका टेम्पोतून नेऊन गोखले महाविद्यालयातील निर्जन परिसरात फेकले होते. मृत तरुणाची ओळख पटविण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
चोरटा समजून केलेल्या मारहाणीत मृत्यू होण्याची गेल्या चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. सोमवारी पहाटे ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे शत्रुघ्न यादव या तरुणाला स्थानिक रहिवाशांनी उलटे टांगून बेदम चोप दिला, त्यात त्याचा मृत्यू झाला होता.

Web Title: Thieves understand the thief; One killed, three held by Borivali