नागपूर: सदर येथील नासुप्रच्या मुख्यालयाजवळील श्रीराम टॉवरसमोर दिवसाढवळ्या एका पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या कारची काच फोडून २५ लाख रुपये असलेली बॅग लंपास करण्यात आली. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. इतका वर्दळीचा रस्ता असूनदेखील फुटेज नसल्याने पोलिसांना आरोपींबद्दल कोणताही सुगावा लागलेला नाही. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
फ्रेंड्स कॉलनी येथील निवासी फराज सिद्दीकी यांचे शहर आणि ग्रामीण भागात सहा पेट्रोल पंप आहेत. कामठी येथील पंडिताईन ढाब्याचे मालक व व्यवसायातील भागीदार शर्मा यांना भेटण्यासाठी सिद्दीकी कामठी मार्गावर गेले होते. पेट्रोल पंपावरील २५ लाख ५० हजारांची रोख घेऊन ते सदरमधील श्रीराम टॉवरजवळ पोहोचले. त्यांना तेथील एका कार्यालयात जायचे होते. त्यांच्या कारमध्ये एका बॅगेत रोख रक्कम होती तर दुसऱ्या बॅगमध्ये लॅपटॉप व काही महत्वाची कागदपत्रे होती. कार पार्क करत असताना सुरक्षारक्षकाने त्यांना चाबी मागितली. मात्र चाबी द्यायची नसल्याने त्यांनी श्रीराम टॉवरच्या बाहेर कार लावण्याचे ठरविले.
एलआयसी चौकातून लिबर्टी टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावरील बसस्टॉपजवळ त्यांनी कार पार्क केली. २.२० वाजता ते आत गेले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कारच्या डाव्या बाजुच्या काचा फोडून दोन्ही बॅग लंपास केल्या. श्रीराम टॉवरमधील काम आटोपल्यावर सिद्दीकी ४० मिनिटांत परतले असता त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार मनिष ठाकरे पथकासह तेथे पोहोचले. सिद्दीकी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून सिद्दीकी यांचा पाठलाग ?पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र एलआयसी चौकातील सीसीटीव्ही बंद असल्याने कोणताही सुगावा लागला नाही. श्रीराम टॉवरजवळ एक खाजगी बँक आहे. फॉर्च्युनर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असल्याने, तेथील कॅमेरादेखील काहीही टिपू शकला नाही. आरोपींनी सिद्दीकी यांचा पाठलाग केल्याचा संशय आहे.