घरफोड्या करून चोरटे बनले कोट्यधीश..!
By Admin | Updated: March 29, 2015 00:21 IST2015-03-29T00:21:58+5:302015-03-29T00:21:58+5:30
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये जसे शरीराविरुद्धचे गुन्हे वाढत चालले आहेत, तसेच मालमत्तेविरुद्धचेही गुन्हे वाढत चालले आहेत.

घरफोड्या करून चोरटे बनले कोट्यधीश..!
लक्ष्मण मोरे ल्ल पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये जसे शरीराविरुद्धचे गुन्हे वाढत चालले आहेत, तसेच मालमत्तेविरुद्धचेही गुन्हे वाढत चालले आहेत. या दोन्ही शहरांमध्ये मिळून गेल्या वर्षभरात चोरट्यांनी केलेल्या १,३६४ घरफोड्यांमध्ये तब्बल २३ कोटी ६७ लाख ६९ हजार ६५१ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरफोड्या असतानाही त्या उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र खूपच कमी आहे. पोलीस ठाण्यांचे आणि गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्यांचा छडा लावण्यात अयशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.
एकेकाळी पेठांपुरते मर्यादित असलेल्या शहराच्या कक्षा झपाट्याने रुंदावत चालल्या आहेत. शहराच्या भोवती उपनगरांची संख्या वाढत चालली आहे. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत चालली आहे. त्या प्रमाणात मात्र पोलिसांचे मनुष्यबळ वाढलेले नाही. तोकड्या आणि अपुऱ्या मनुष्यबळावर पोलिसांना दैनंदिन कामकाजासोबत तपासाचा गाडा ओढावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांच्याकडून अपेक्षित असलेले परिणामही पाहायला मिळत नाहीत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये दिवसाला साधारणपणे चार घरफोड्या होत आहेत. तर, महिन्याला साधारणपणे १२० च्या आसपास सरासरी घरफोड्या होत असल्याची आकडेवारी आहे. तर, महिन्याला साधारणपणे १९ लाखांचा ऐवज चोरटे लांबवत आहेत. रात्रीच्या वेळी सर्वाधिक घरफोड्या होत असल्या, तरी अलीकडच्या काळात दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: उपनगरांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण अधिक आहे. यासोबत पुणे शहराच्या मध्यवस्तीतील विश्रामबाग, फरासखाना, खडक आणि डेक्कन पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्येही गेल्या काही दिवसांत घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी, चिखली, भोसरी, काळेवाडी, निगडी, चिंचवड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, रहाटणी आदी भागातही घरफोड्या वाढल्या आहेत. तर, पुण्याच्या भोवतालची वारजे, कोथरूड, हडपसर, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, फुरसुंगी, कोंढवा, मुंढवा, खडकवासला आदी भागांत घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांकडून मात्र ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.
शेजारीच खरा पहारेकरी
घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ ही योजना सुरु केली होती. आपल्या शेजारी कोण राहतो, याची माहिती नागरिकांनी ठेवावी. घराबाहेर जाताना, बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना देऊन जावे, तसेच घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे. आपल्या शेजारी काय चालले आहे, काही संशयास्पद तर नाही ना, याची प्रत्येक शेजाऱ्याने काळजी घेतली, तर या घटना कमी होऊ शकतात. कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस पोचू शकत नाहीत.
घरफोडीच्या घटनांना रोखण्यात जसे पोलीस अयशस्वी ठरले आहेत, तसेच नागरिकही कमी पडत आहेत. आपल्या घराची सुरक्षा केवळ एका कुलपाच्या आधारे सोडून घरातील सर्व व्यक्ती बाहेर जातात. अनेक घरांना लॅचलॉक नसते.
चोरटे दरवाजाचा कडीकोयंडा, कुलूप कटावणीच्या साह्याने उचकटून घरातील ऐवज लंपास करतात. तर अनेकदा कटरच्या साह्याने ग्रीलचे दार किंवा खिडक्या तोडून ऐवज लांबवला जातो. पोलिसांनी अनेकदा आवाहन करुनही नागरिक सोसायट्यांमध्ये, घरांभोवती सीसीटीव्ही बसवीत नाहीत. जे बसवतात त्यांचा दर्जा फारच सुमार असतो. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अडचणी येतात.
गुन्हे सन २०१४ सन २०१५
दाखल १३६४ २२२
उघड ४५३ ३९
सरासरी ३३.२१% १७.५६%
गेला माल २३,६७,६९,६५१ रु.२,८०,५६,५८९ रु.
मिळाला माल २,४६,३७,९४६ रु.३२,९३,२८२ रु.