लोकमतच्या पुरस्कारांची असते वर्षभर प्रतीक्षा, अर्थमंत्री सीतारामन यांचे उद्गार; पद्म पुरस्कारांशी केली तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 02:23 AM2021-03-17T02:23:10+5:302021-03-17T07:00:50+5:30

महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृतीवर विशेष प्रेम असल्याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या,  “छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कथा ऐकून आपण लहानाचे मोठे झालो.

There is a year-long wait for Lokmat awards, says Finance Minister Sitharaman; Comparison with Padma Awards | लोकमतच्या पुरस्कारांची असते वर्षभर प्रतीक्षा, अर्थमंत्री सीतारामन यांचे उद्गार; पद्म पुरस्कारांशी केली तुलना

लोकमतच्या पुरस्कारांची असते वर्षभर प्रतीक्षा, अर्थमंत्री सीतारामन यांचे उद्गार; पद्म पुरस्कारांशी केली तुलना

Next

नवी दिल्ली : समाजाविषयीची असलेली बांधिलकी लोकमत समूह उत्तमरीत्या पार पाडत आहे, असे कौतुकोद्गार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिल्लीत काढले. ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ पुरस्कार विजेत्यांना अर्थमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची नामवंतांना वर्षभर प्रतीक्षा असते, असे गौरवोद्गारही अर्थमंत्र्यांनी काढले.    

महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृतीवर विशेष प्रेम असल्याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या,  “छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कथा ऐकून आपण लहानाचे मोठे झालो. माझी आई  मराठी साहित्याचे तामिळमध्ये भाषांतर करून, या प्रेरणादायी कथा ऐकवित असे.” पंढरपूर तसेच साताऱ्याच्या गौरवशाली इतिहासाचा तसेच संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या रचनांचाही सीतारामन यांनी आवर्जून उल्लेख केला. तामिळ संस्कृतीवर महाराष्ट्राचा प्रभाव असल्याचेही त्या म्हणाल्या.

अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कारांची तुलना सर्वाेच्च नागरिक सन्मान पद्म पुरस्कारांशी केली. पद्म पुरस्कार सर्वसामान्य माणसाचा असायला हवा, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. म्हणूनच या वेळी महाराष्ट्रातून सिंधूताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, जसवंती पोपट व नामदेव कांबळे यांच्यासारख्यांना निवडण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

कोरोना काळात अर्थव्यवस्था सांभाळताना सीतारामन यांनी घेतलेल्या निर्णयांचे  माजी खासदार विजय दर्डा यांनी कौतुक केले. ते म्हणाले, आर्थिक स्थिती गंभीर असूनही अर्थमंत्र्यांनी ज्या पद्धतीचा अर्थसंकल्प सादर केला, त्यासाठी त्यांचे नाव  कायम घेतले जाईल. विजय दर्डा यांनी या वेळी लोकमतच्या पुरस्कारांच्या प्रक्रियेची माहिती दिली. कठोर प्रक्रियेनंतर विजेत्यांची कशी निवड करण्यात येते, ते सांगताना, प्रक्रियेत जनतेचेही मत मागविण्यात येते, हे नमूद केले. पुरस्काराची निष्पक्षता कायम ठेवण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व सक्षम व्यक्तींच्या ज्युरींद्वारे अंतिम विजेते निवडले जातात. आपल्या कामगिरीद्वारे महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्यांचा यात समावेश करण्यात येतो, असे ते म्हणाले.

विशेष कौतुक 
पुरस्कार समारंभात सीतारामन म्हणाल्या, समाजासाठी योगदान देणाऱ्यांना ओळख देण्याचे तसेच महाराष्ट्रातील सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम ‘लोकमत’ अनेक वर्षे  करीत आहे. त्यामुळेच प्रतिष्ठेच्या पुरस्कारांना मोठ्या संधीचे स्वरूप आले आहे. एक व्यावसायिक संस्था असूनही लोकमत समूहाने आपले सामाजिक दायित्व चांगल्या पद्धतीने पार पाडले आहे. या पुरस्कारांची संकल्पना तसेच पारदर्शक निवडीबाबत अर्थमंत्र्यांनी लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांचे विशेष कौतुक केले.
 

Web Title: There is a year-long wait for Lokmat awards, says Finance Minister Sitharaman; Comparison with Padma Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.