मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:17 AM2024-05-07T06:17:32+5:302024-05-07T06:18:23+5:30

मतदानाला अवघे १७-१८ दिवस राहिले असताना त्यांची उमेदवारी घोषित झाली. प्रचाराकरिता त्यांच्या हातात फारच कमी दिवस आहेत. त्यातून मालाडवगळता उत्तर मुंबईत काँग्रेसचे फारसे अस्तित्त्व नाही.

Marathi votes for BJP or Congress? piyush goyal, Bhushan patil Both the candidates have no experience of contesting Lok Sabha elections | मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही

मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही


रेश्मा शिवडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर मुंबईत भाजपमधील शीर्षस्थ नेतृत्वाचा आशीर्वाद लाभलेल्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराशी काँग्रेसचे भूषण पाटील यांना दोन हात करावे लागणार आहेत.

खरेतर या दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही. परंतु, पाटील यांच्याकरिता जमेची बाजू म्हणजे ते स्थानिक आहेत. दुसरे म्हणजे त्यांचे मराठी असणे. मात्र बोरिवली वगळता पाटील यांचे नेतृत्व उत्तर मुंबईत फारसे चर्चेत राहिलेले नाही. मतदानाला अवघे १७-१८ दिवस राहिले असताना त्यांची उमेदवारी घोषित झाली. प्रचाराकरिता त्यांच्या हातात फारच कमी दिवस आहेत. त्यातून मालाडवगळता उत्तर मुंबईत काँग्रेसचे फारसे अस्तित्त्व नाही. पाटील यांना उद्धवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाची किती साथ लाभते त्यावर ते गोयल यांना किती तगडी लढत देऊ शकतात, हे ठरेल.

गेल्या दोन्ही निवडणुकांत भाजपचे गोपाळ शेट्टी तब्बल ७० टक्के मते घेऊन य़ेथून निवडून आले होते. त्याआधी २००४ साली गोविंदाने तर २००९ साली संजय निरूपम यांनी भाजपच्या राम नाईक यांना धूळ चारली होती. त्यापैकी २००९ साली, निरूपम यांच्या कर्तृत्वापेक्षा मनसेने इथल्या मराठी मतांना पाडलेले खिंडार त्यांना विजयाकडे घेऊन गेले होते. हे दोन अपवाद वगळता उत्तर मुंबई हा कायम भाजपच्या पारड्यात दान टाकत राहिला आहे. तेही इथला निर्णायक टक्का मराठींचा असताना. गोयल यांनी सुरुवातीला प्रचारात फक्त केंद्रीय योजनांवर, मोदींच्या कामगिरीवर जोर देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता त्यांच्या भाषणात स्थानिक प्रश्नही येऊ लागले आहेत.

इथल्या प्रचाराचा भर मराठी विरुद्ध गुजराती, शाकाहार-मांसाहार यांवरच राहण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांना सामोरे जाताना, तीही सेनेची साथ नसताना भाजप शिंदेसेना आणि मनसेच्या मदतीने किती मराठी मते आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पीयूष गोयल I भाजप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू मंत्री अशी पीयूष गोयल यांची ओळख आहे. आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत गोयल प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गोयल यांचे वडील वेदप्रकाश अटलबिहारी सरकारमध्ये मंत्री होते. ते भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष होते. तर आई चंद्रकांता या आमदार होत्या. अशी राजकीय पार्श्वभूमी असलेले गोयल उच्चविद्याविभूषित व धाडसी आहेत. सीए, विधी विषयातील पदवी त्यांच्या नावावर जमा आहे. त्यांच्या नावावर एकही केस नोंदली गेलेली नाही.

भूषण पाटील I काँग्रेस
भूषण पाटील यांना तशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. उत्तर मुंबईत मालाडवगळता काँग्रेसचे फारसे अस्तित्व नाही. परंतु, बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटील यांनी उत्तर मुंबईत कायम काँग्रेस नेतृत्वाची धुरा वाहिली आहे. २००९ साली गोपाळ शेट्टीच्या विरोधात ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांनी मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष पद सांभाळले आहे.

Web Title: Marathi votes for BJP or Congress? piyush goyal, Bhushan patil Both the candidates have no experience of contesting Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.