भाजपाकडून राज्यात दंगली भडकवण्याचा प्रयत्न वारंवार झाला; भास्कर जाधवांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 12:22 IST2022-09-04T12:21:44+5:302022-09-04T12:22:45+5:30
भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

भाजपाकडून राज्यात दंगली भडकवण्याचा प्रयत्न वारंवार झाला; भास्कर जाधवांची टीका
रत्नागिरी - भारतीय जनता पार्टीने राज्यात वेगवेगळे विषय उभे करून दंगल घडवण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. कधी कंगना रणौत, सुशांत सिंग राजपूत तर कधी नुपूर शर्मा, काही जणांच्या हाती भोंगा दिला आणि एकाकडे हनुमान चालीसा दिली. नानातऱ्हेने महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे मुख्यमंत्री सर्वजाती धर्माचे लाडके होतायेत त्यासाठी भाजपा अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत होती असा आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला आहे.
भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जाधवांनी भाजपावर हल्लाबोल केला. भास्कर जाधव म्हणाले की, आज मुंबईत सगळीकडे बॅनर्स लागले आहेत. आपले सरकार आले आणि हिंदुचे सणांवरील विघ्न टळले. बेस्ट बस, बसस्टॉपवर आहे. यंदाचा शिमगा, गुढीपाडवा, ईद हे सगळे सण विनाअडथळा सुरू करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले असा टोला जाधवांनी शिंदे-भाजपा सरकारला लगावला.
बंडखोर आमदार विश्वासघातकी
४० आमदारांनी शिवसेनेशी विश्वासघात केला हे महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही. उद्धव ठाकरेंसारख्या सोज्वल माणसाला ज्यांना राजकारण जमलं नाही त्यांना विश्वासघाताने राजगादीवरून खाली खेचण्यात आले. या अनंत वेदना सगळ्या जातीधर्मातील लोकांमध्ये आहे. शिवसेना आणखी वाढणार आहे. पण तिला योग्य प्रकारे आकार, दिशा देणे, आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हे माझं काम असेल असं भास्कर जाधवांनी म्हटलं.
रामदास कदम बेईमान
रामदास कदम आहेत कोण? त्यांचा संबंध काय? रामदास कदमांसारखा कृतघ्न माणूस मी बघितला नाही. ज्याप्रकारे रामदास कदम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल जी भाषा वापरत आहेत. टीका करत आहेत. ते कदम इतके कृतघ्न असतील वाटलं नव्हतं. याच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दसरा मेळावा झाला तेव्हा तुम्ही नेते म्हणून भाषण केले. आज त्याच उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेऊ नये म्हणणं म्हणजे तुम्ही किती उलट्या काळजाचे आहात. तुम्ही किती बेईमान आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं आहे असा घणाघात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला.