शत्रूवरही संसदेत बसण्याची वेळ येऊ नये : अनु आगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 21:03 IST2019-03-12T21:01:10+5:302019-03-12T21:03:15+5:30
राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी हा माझ्यासाठी सर्वात वाईट काळ होता. माझ्या आयुष्याची सहा वर्षे तिथे वाया गेली...

शत्रूवरही संसदेत बसण्याची वेळ येऊ नये : अनु आगा
पुणे : राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी हा माझ्यासाठी सर्वात वाईट काळ होता. माझ्या आयुष्याची सहा वर्षे तिथे वाया गेली. संसदेत कोणीही एकमेकांचा आदर करत नाही. शत्रूवरही संसदेत बसण्याची वेळ येऊ नये, अशा शब्दांत उद्योजिका आणि समाजसेविका अनु आगा यांनी निशाणा साधला. मतदारांनी योग्य आणि सक्षम लोकप्रतिनिधींचीच निवड करायला हवी. आपण ज्यांना निवडून दिले आहे, त्यांना परखडपणे प्रश्न विचारायला हवेत. योग्य राज्यकर्ते असतील तरच देशाचे भविष्य उज्ज्वल असेल, असा सल्लाही त्यांनी दिला.
जनसेवा फौंडेशनतर्फे मीट द स्टॉलवर्ट, भेटू या एका दिग्गजाला या कार्यक्रमांतर्गत अनु आगा यांची प्रकट मुलाखत पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यभेचे खासदार आणि अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यध्यक्षस्थानी विकफिल्ड ग्रुपचे चेअरमन बहारी बी.आर. मल्होत्रा होते. यावेळी डॉ. शां.ब. मुजुमदार, जॅकी मल्होत्रा, कृष्णकुमार गोयल, मोहन जोशी, विजय सराफ, संजय सिन्हा, विनोद शहा, राजेश शहा उपस्थित होते.
आगा म्हणाल्या, आपण नेहमीच स्वत:ला कमी लेखतो. आधी स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. प्रत्येक सामान्य व्यक्तीमध्ये असामान्यत्व दडलेले असते. या असामान्यत्वाचा शोध आपणच लावायला हवा. त्याचवेळी मी असामान्य आहे, ही भावना आपल्यावर स्वार होता कामा नये. आयुष्यात किंवा व्यवसायात चढता आलेख, लाभ महत्वाचा असतो. मात्र, केवळ त्यावर लक्ष केंद्रित करुन चालणार नाही. आयुष्याचे ध्येय जास्त महत्वाचे असते. त्यामुळे कोठे स्वल्पविराम, पूर्णविराम द्यायचा, हे आपले आपणच ठरवायला हवे.
मी कधीच टीव्ही पाहत नाही, तर पुस्तकांमध्ये रमते. आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा प्रत्येकाचे आयुष्य जगू शकत नाही. मात्र, हा अनुभव पुस्तकांमधून मिळतो. पुस्तक हे सर्वात छान मित्र असतात. माझ्यावर महात्मा गांधीजी आणि माझे पती रोहिंग्टन आगा यांचा खूप प्रभाव आहेह्ण, याकडेही आगा यांनी लक्ष वेधले.
जनसेवा फाऊंडेशनचे विनोद शहा यांनी प्रास्ताविक केले. आगा यांची मुलाखत नीरजा आपटेआणि डॉ. वर्धमान जैन यांनी घेतली. प्रा. जे.पी. देसाई आणि विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.