फाजील लोकांना लोकशाहीत स्थान नसते- दिवाकर रावते
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 01:08 IST2018-07-12T21:07:53+5:302018-07-13T01:08:51+5:30
लोकमत की अदालतमध्ये अॅड. उज्ज्वल निकम यांनी सत्तेत असलेल्या शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना प्रश्न विचारला

फाजील लोकांना लोकशाहीत स्थान नसते- दिवाकर रावते
नागपूर- विधान परिषद व विधानसभेत वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या लोकप्रतिनिधींना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्यानं गौरविण्यात आलं आहे. लोकमत की अदालतमध्ये अॅड. उज्ज्वल निकम यांनी सत्तेत असलेल्या शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना प्रश्न विचारला आहे. शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी विधानसभेऐवजी विधान परिषदेतील आमदारांचा विचार केला जातो, त्यावर विधानसभेतले शिवसेनेचे आमदार नाराज आहेत, असा सवाल अॅड. उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला. त्याला दिवाकर रावतेंनी सडेतोड उत्तर दिलं.
सत्तेत कोणाला मंत्री करायचे हे पक्षश्रेष्ठी ठरवतात. फाजील लोकांना लोकशाहीत स्थान नसते. हा अन्यायाचा विषय नसून संधीचा विषय आहे. संधी मिळेल शंभर टक्के मिळेल, असं रावते म्हणाले आहेत. राजकारण आणि न्यायालयाची तुलनात्मक मांडणी करताना अॅड. उज्ज्वल निकम यांनी राजकारण्यांवर मिश्कील शरसंधान केले. आरोपीच्या पिंज-यात सुधीर मुनगंटीवार, दिवाकर रावते, जयंत पाटील आणि विखे पाटील यांना उभे करण्यात आले होते.
या सोहळ्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गौरवास्पद कामगिरी करणारे विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
याचबरोबर, सुनील प्रभू यांचा उत्कृष्ट नवोदित आमदार(विधानसभा), अनिल सोले यांचा उत्कृष्ट नवोदित आमदार (विधानपरिषद), श्रीमती यशोमती ठाकूर यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा), श्रीमती विद्या चव्हाण यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानपरिषद), आशिष शेलार यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानसभा) आणि संजय दत्त यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानपरिषद) म्हणून सन्मान करण्यात आला.