"शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही’’, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 19:23 IST2023-06-02T19:22:29+5:302023-06-02T19:23:24+5:30
Prithviraj Chavan Criticize Shinde-Fadanvis Government: पराभवाची धास्ती असल्यानेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

"शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही’’, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला
मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्या गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. त्यामुळे या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. दरम्यान, देशातील एकूण चित्र पहाता राज्यातील शिंदे फडणवीस सरकार निवडणुकीस जाण्याच्या तयारीत नाही. त्यांना पराभवाची धास्ती असल्यानेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आगामी निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दोन दिवसांची आढावा बैठक आयोजित केली असून सर्व ४८ मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. ही जागा वाटपाची बैठक नसून फक्त स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी यांची मते अजमावली जात आहेत. चर्चा सकारात्मक होत असून राज्यातील शिंदे-फडणवीस या जातीवादी सरकारला गाडण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने ज्यापद्धतीने मविआचे सरकार पाडले त्याचा तीव्र संताप जनतेत आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचा संदेश जनमानसात गेला असून महाविकास आघाडी करूनच निवडणुका लढवल्या जाव्यात असा एकंदर सुर बैठकीत उमटत आहेत.
देशातील एकूण चित्र पहाता राज्यातील शिंदे फडणवीस सरकार निवडणुकीस जाण्याच्या तयारीत नाही. त्यांना पराभवाची धास्ती असल्यानेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहेत, असे विधान चव्हाण यांनी यावेळी केले.