"पुतळा 35 फुटांचा असणार हे सांगितलेच नाही", अधिकाऱ्याचा नवा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:01 IST2024-08-29T13:57:47+5:302024-08-29T14:01:37+5:30
Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याच्या परवानगीबद्दल राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी वेगळाच दावा केला आहे.

"पुतळा 35 फुटांचा असणार हे सांगितलेच नाही", अधिकाऱ्याचा नवा गौप्यस्फोट
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर एक दुर्घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता राज्याच्या कला संचालनालयाच्या संचालकांनी एक गौप्यस्फोट केला आहे. राजीव मिश्रा यांनी पुतळ्याच्या उंचीबद्दल वेगळीच माहिती दिली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक राजीव मिश्रा यांनी ३५ फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली गेलीच नव्हती, अशी माहिती दिली. ६ फुटांच्या पुतळ्यालाच परवानगी दिली गेली होती, असे राजीव मिश्रा म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा : राजीव मिश्रांनी काय सांगितले?
राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा म्हणाले की, "या प्रकरणात असे झाले की, क्ले मॉडेलला मान्यता त्यांनी घेतली आणि आमच्याकडून नौदलाला ही मान्यता देण्यात आली. जेव्हा ही मान्यता दिली गेली, तेव्हा आम्हाला हे सांगितले गेले नव्हते की, हा पुतळा ३५ फुटाचा असणार आहे. आणि या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टील वापरणार आहेत", अशी माहिती मिश्रा यांनी दिली.
"आमच्याकडे फक्त ६ फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती. जेव्हा जेव्हा त्यांना हे करायचं (पुतळा उभारायचा) असते, तेव्हा त्यांनी माहिती दिली नाही, तर आम्हाला त्यांना विचारता येत नाही. तशी तरतूद नाही. या पुतळ्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती. त्यामुळे आम्हाला काही करता आले नाही. याबाबती त्या लोकांनी त्यांच्याच स्तरावर निर्णय घेतला", असेही राजीव मिश्रा यांनी सांगितले.
चुकीचा पुतळा उभारण्यासाठी जबाबदार कोण?
या प्रश्नाला उत्तर देताना राजीव मिश्रा म्हणाले की, "जेव्हा कलाकारांकडे हे काम दिले गेले, तेव्हा ज्या एजन्सीने त्यांना उंची आणि मटेरियल ठरवण्याचा निर्णय दिला. त्या समितीमध्ये कलाकारांनी हे सांगायला पाहिजे होते की, मी हे ३५ फुटांचा पुतळा करणार आहे. मला त्यासाठी तांत्रिक मदत लागेल. तांत्रिक सहाय्य म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअरची त्याला मदत घ्यावी लागेल", अशी भूमिका मिश्रा यांनी मांडली.