कोकाटेंच्या व्हिडीओची अद्याप चौकशी नाही; विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:27 IST2025-07-25T12:27:18+5:302025-07-25T12:27:54+5:30
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधान परिषदेत मोबाइलवर रमी खेळत होते का याची कोणतीही चौकशी विधानमंडळ सचिवालयाने अद्याप सुरू केलेली नाही,

कोकाटेंच्या व्हिडीओची अद्याप चौकशी नाही; विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे स्पष्टीकरण
मुंबई : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधान परिषदेत मोबाइलवर रमी खेळत होते का याची कोणतीही चौकशी विधानमंडळ सचिवालयाने अद्याप सुरू केलेली नाही, असे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अशी चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, आम्ही चौकशी स्वत:हून करण्याचे काहीही कारण नाही. त्या कथित व्हिडीओबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तो व्हिडीओ विधान परिषदेतील असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, याबाबत आमच्याकडे कोणीही तक्रार केलेली नाही. पोलिसात कोणीही तक्रार केलेली नाही. तसे झाले तर आम्हाला चौकशी करता येऊ शकेल.
एखाद्या आमदार, मंत्र्यानेच कोकाटे यांचा व्हिडीओ काढून तो आ. रोहित पवार यांना दिला असावा, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, जाणकारांच्या मते हा व्हिडीओ वरच्या बाजूने म्हणजे प्रेक्षक दीर्घेतून चित्रित केला असावा असा तर्कदेखील दिला जात आहे. याबाबत विचारले असता प्रा. शिंदे म्हणाले, की याची आपल्याला काहीएक कल्पना नाही. चौकशीच झालेली नसेल तर मग त्यावर भाष्य कसे करणार?
रोहित पवार यांचा दावा
प्रा. शिंदे यांनी असे म्हटले असले तरी शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांनी या व्हिडीओची चौकशी सरकार करीत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, की उच्च न्यायालयाने सांगूनही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुन्यांवर गुन्हा दाखल होत नाही.
संतोष देशमुख प्रकरणातही झालेली दिरंगाई सर्वांनी पाहिली, पण विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या मंत्र्यांचा व्हिडीओ कुणी काढला याची मात्र सरकार चित्त्याच्या वेगाने चौकशी करत आहे. रमी खेळणाऱ्या मंत्र्याचे पितळ उघड करणारा विधिमंडळात बसलेला असो की गॅलरीत ते महत्त्वाचे नाही तर मंत्र्यांचा कारनामा जगापुढे आणला ते महत्त्वाचे आहे. व्हिडीओ काढणारी व्यक्ती उद्या पुढे आली तर राज्यातील चार कोटी शेतकऱ्यांसह महाराष्ट्र त्यांचा सत्कारच करेल.
समोरासमोर बसून चर्चा करणार : उपमुख्यमंत्री
आधी एकदा ते काही बोलले तेव्हा मी त्यांना समज दिली होती. दुसऱ्यांदा बोलले तेव्हाही ताकिद दिली होती. इजा झाले, बिजा झाले आता तिजा होऊ देऊ नका असेही सांगितले होते. मात्र, आता त्यांच्यावर जो आरोप केला जात आहे. सोमवारी किंवा मंगळवारी मी त्यांच्याशी समोरासमोर बसून चर्चा करणार आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.