नमुने घेण्यास निरीक्षक नाही; बनावट गोळ्या कशा कळणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 08:11 IST2024-12-13T08:11:04+5:302024-12-13T08:11:17+5:30
राज्यात औषध निरीक्षकांची ११९, तर सहायक आयुक्तांची ४२ पदे रिक्त

नमुने घेण्यास निरीक्षक नाही; बनावट गोळ्या कशा कळणार ?
- सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्यात बनावट औषधे, गाेळ्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडला आहे. औषध विभागाकडे सॅम्पल घेण्यासाठी औषध निरीक्षक आणि घेतलले सॅम्पल तपासायला शास्त्रज्ञ नसल्यानेच या बनावट कंपन्यांचे फावत असल्याचे समोर आले आहे. सॅम्पल घ्यायला इन्स्पेक्टरच नाहीत, मग बनावट, गोळ्या औषधे कशी शोधणार? असा प्रश्न आहे. राज्यात सहायक आयुक्तांची ४२ तर, औषध निरीक्षकांची तब्बल ११९ पदे रिक्त आहेत.
अंबाजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात ‘ॲझिथ्रोमायसीन ५००’ या बनावट गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे प्रकरण आठवड्यापूर्वी उघड झाले. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हाही दाखल झाला. या रुग्णालयात कोल्हापूरमधील मे. विशाल एन्टरप्रायजेसकडून गोळ्यांचा पुरवठा झाला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये अन्न व औषध प्रशासनाने या गोळ्यांचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. परंतु, याचा अहवाल येण्यासाठी ऑक्टोबर २०२४ उजाडले. या आधीही या कंपनीने ठाणे, नागपूरसह इतर ठिकाणी बनावट गोळ्यांचा पुरवठा केल्याचे समोर आले होते. त्यामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. परंतु, हे सर्व बनावट प्रकार उघड करण्यासाठी औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळच नसल्याचे उघड झाले आहे.
का होतो अहवाल यायला उशीर?
राज्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे प्रयोगशाळा आहेत. राज्यभरातून आलेले सॅम्पल या तीनच प्रयोगशाळांत तपासले जातात. या प्रयोगशाळांमधील पदे रिक्त असल्याने अहवाल येण्यास उशीर होतो.
केवळ ८१ निरीक्षक कर्तव्यावर
राज्यातील २०० पैकी ८१ औषध निरीक्षकच कर्तव्यावर आहेत. अनेक जिल्ह्यांत एकही निरीक्षक नाही. आहे त्या अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे.
राज्यात रिक्त असलेली महत्त्वाची पदे अशी
पदे मंजूर रिक्त
सहायक आयुक्त ६७ ४२
औषध निरीक्षक २०० ११९
तीन प्रयोगशाळांमध्ये किती पदे रिकामी?
पदे मंजूर रिक्त
वरिष्ठ तांत्रिक सहायक ४५ ३७
विश्लेषण रसा. शास्त्रज्ञ ४० २१
वैज्ञानिक अधिकारी ४४ २०
जाहिरात निघाली; नव्या वर्षात पदभरती
प्रयोगशाळेच्या वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. याची परीक्षा ३० व ३१ डिसेंबर रोजी होईल.
त्यानंतर गुणवत्ता यादी लावून ही रिक्त पदे भरली जातील. औषध निरीक्षकांची पदे एमपीएससीमार्फत भरली जातात. ही पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली जात आहे.