निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरी बसवून तरुणांना मनसेत नवी संधी मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 05:58 IST2025-02-13T05:58:10+5:302025-02-13T05:58:46+5:30
शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांनी आचारसंहिता बनविण्याचे काम हाती घेतले आहे.

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरी बसवून तरुणांना मनसेत नवी संधी मिळण्याची शक्यता
महेश पवार
मुंबई : वरळी येथील मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतःच पक्षाची आचारसंहिता बनवित आहेत. पक्ष स्थापनेवेळी नाव आणि झेंडा कोणता असेल, हा निर्णय त्यांनी घेतला. आताही पक्षात कोणती पदे असतील, त्याची पुनर्रचना कशी असेल, आचारसंहितेत कोणते मुद्दे असावेत, याचा अभ्यास करून आराखडा तयार करीत आहेत. यामुळे निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरी बसवून तरुणांना पक्षात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे, असे मनसे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
वरळीतील मेळाव्यात नेते, विभाग अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी आचारसंहिता लागू करून पदांमध्ये बदल करून निराश लोकांना पक्षात स्थान दिले जाणार नाही, असे स्पष्ट केल्यामुळे या आचारसंहितेची उत्सुकता लागली आहे.
राज ठाकरे आचारसंहिता ९ मार्चला जाहीर करणार
शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांनी आचारसंहिता बनविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी ते ठराविक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत आहेत. मात्र, आराखडा बनविण्यासाठी कुणाची मदत घेत नाहीत. त्याची गुप्तता बाळगली जात आहे. ९ मार्चला वर्धापनदिनी मेळाव्यातून पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यासाठी आचारसंहिता बनविण्याचे काम सुरू आहे. त्यावर विचारविनिमय करण्यात येत आहे. एक-दोन दिवसांमध्ये त्याची बैठक होणार आहे. - बाळा नांदगावकर, मनसे नेते