जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:17 IST2025-09-05T07:17:02+5:302025-09-05T07:17:44+5:30
हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसीमध्ये जाईल, तर औंध संस्थानच्या गॅझेटियरनंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फायदा होईल

जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
छत्रपती संभाजीनगर - मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासह प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने नवा जीआर काढला. याची अंमलबजावणी करताना दगाफटका केला, तर सुपडा साफ होईल, असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी येथे दिला. या जीआरवर विनाकारण संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
ओबीसी समाजासाठी सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करत आता मायक्रो ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठीही उपसमित्या स्थापन कराव्यात, असा खोचक सल्लाही जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसीमध्ये जाईल, तर औंध संस्थानच्या गॅझेटियरनंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फायदा होईल. या जीआरवर विनाकारण संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. आपल्याला काहीच मिळाले नाही, अशी बोंब कोणीही मारू नये.
‘...तर थेट वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी गेलो असतो’
मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. याविषयी जरांगे म्हणाले की, मला जर फडणवीस यांना अडचणीत आणायचे असते, तर थेट वर्षावर गेलो असतो. मी समाजासाठी तेथे गेलो. मला राजकीय पक्षांशी देणेघेणे नाही. मी कशाला कोणाला माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू देऊ?
छगन भुजबळ सरकारचे मालक आहेत का?
मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यामुळे भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, याकडे लक्ष वेधले असता भुजबळ सरकारचे मालक आहेत का, असा प्रतिप्रश्न जरागेंनी केला.