...तर तुम्ही हिमालयात जाऊन साधूसंत व्हा; सुरेश धसांवर बरसले जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:27 IST2025-02-10T12:27:27+5:302025-02-10T12:27:58+5:30
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार धस यांच्यावर निशाणा साधला आहे.

...तर तुम्ही हिमालयात जाऊन साधूसंत व्हा; सुरेश धसांवर बरसले जितेंद्र आव्हाड
NCP Jitendra Awhad: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात मध्यस्थी करताना भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानावरून संताप व्यक्त केला जात आहे. "एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे," अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुरेश धस यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, "दुसर्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्याने येऊन, 'जाऊ द्या, त्याला माफ करा', हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात, हा ज्याचा-त्याचा विचार आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच; याची खात्री आम्ही देतो," अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे.
दरम्यान, "सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. हा खूनच आहे... अक्षय शिंदेचा खूनच आहे; सोमनाथ सूर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही," असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.